17 कोटी खर्चून लावणार उड्डाण पुलांवर दिवे

ज्ञानेश सावंत
शनिवार, 12 जानेवारी 2019

पुणेकरांना पायाभूत सुविधा देण्याला आमचे प्राधान्य आहे. विद्युत दिवे बसविण्याची योजना अर्थसंकल्पात होती. तिची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शिवाय, अन्य पायाभूत सुविधाही पुरविण्यात येत आहेत. 

- मुक्ता टिळक, महापौर 

पुणे : महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांतील साडेपाच ते सहा लाख रहिवाशांसाठी पाणी, आरोग्य आणि वाहतूक सेवा रखडल्या, दुर्बल घटकांच्या योजना बंद झाल्या, उड्डाण पुलांसह अनेक महत्त्वाची कामे कागदोपत्रीच राहिली. याचे कारण काय तर महापालिकेकडे पैसा नाही. आता याच महापालिकेतील पदाधिकारी-अधिकाऱ्यांनी उड्डाण पुलांवर 17 कोटी रुपयांचे दिवे लावण्याचा उद्योग सुरू केला असून, त्यातून केवळ 13 उड्डाण पूल उजळणार आहेत. म्हणजे एका पुलावर एक ते सव्वाकोटीचे दिवे लागणार आहेत. 

मुळात रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती होत नसताना उड्डाण पुलांवर विद्युत दिवे का लावायचे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. याचवेळी ही योजना ठराविक ठेकेदाराला मिळावी, याकरिता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे वशिलाही लावण्यात आला आहे. या योजनेसाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पातून 14 कोटी रुपये वापरले. त्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांनी जिल्हा नियोजन समितीचा तीन कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. महापालिकेच्या पूर्वगणकपत्र समितीच्या बैठकीत प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामाला लगेचच "हिरवा कंदील' दाखविल्यामुळे आता संपूर्ण शहरातील उड्डाण पूल झळाळून निघणार आहेत. हे दिवे लावण्याआधीच त्यांच्या देखभाली-दुरुस्तीचे स्वतंत्र काम आखून त्याचीही निविदा काढण्याचा प्रयत्न आहे. मात्र, हे दिवे घेतले जाणार आहेत, त्यांच्याकडेच देखभाल सोपविण्याचाही विचार सुरू आहे. 17 कोटींपैकी तीन कोटींच्या कामांची निविदा काढली आहे. 

काय आहे दिव्यांची योजना? 

शहरात नव्याने काही उड्डाण पूल उभारले आहेत. रात्रीच्या वेळी वाहनचालकांची सोय व्हावी आणि पुलांचे सौंदर्य खुलावे यासाठी पुलांवर विद्युत दिवे लावण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. त्यासाठी निविदाप्रक्रिया राबविण्यात येत आहे. वर्दळीच्या म्हणजे, स्वारगेट येथील उड्डाण पुलाची दुरवस्था झाली, त्यामुळे वाहनचालकांचे हाल होऊन अपघात होण्याची भीती आहे. तरीही त्याच्या देखभालीकडे लक्ष दिले जात नाही. 

जुने दिवे असतानाही नवे! 

सध्या सर्वच उड्डाण पुलांवर दिवे आहेत. गेल्या तीन-चार वर्षांत ज्या उड्डाण पुलांची उद्‌घाटने झाली, त्याचवेळी हे दिवे लावण्यात आले, त्यावरही कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला आहे. बहुतांशी दिवे आणि त्यांच्या खाबांची स्थिती चांगली आहे तरीही ते बदलून नव्या योजनेत नवे दिवे बसविले जाणार आहेत. काही पुलांवरील दिवे चार-सहा महिन्यांपूर्वी बदलले आहेत. त्यामुळे लाखो रुपये वाया जाण्याची शक्‍यता आहे. 

शहरातील 13 उड्डाण पुलांवर विद्युत दिवे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी 17 कोटी रुपये खर्च असून, त्यातील 3 कोटींच्या कामाची निविदा काढली आहे. योजनेचा अभ्यास करून तिचा प्रस्ताव मंजूर केला आहे. मात्र, हे काम चांगल्या दर्जाचे असेल, याकडे लक्ष दिले जाईल. निविदाप्रक्रियाही पारदर्शक होईल. 

- श्रीनिवास कंदुल प्रमुख, विद्युत विभाग, महापालिका 

उड्डाणपूल 
13 
दिवे 
80-90 
निविदा 
17 कोटी 

Web Title: Lamps on flyovers to spend Rs 17 crores