हा कुठला न्याय? हे कसले सरकार?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

नारायणगाव - महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. त्यासाठी पुणे येथील कार्यालयात हेलपाटे मारून आम्ही थकलो. जमिनीचा मोबदला देण्यासाठी भूसंपादन कार्यालयातील एक महिला पैशाची मागणी करते. हा कुठला न्याय? ही कसली लोकशाही व कसले सरकार? असा सवाल करत आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) यांना धारेवर झाले. 

नारायणगाव - महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. त्यासाठी पुणे येथील कार्यालयात हेलपाटे मारून आम्ही थकलो. जमिनीचा मोबदला देण्यासाठी भूसंपादन कार्यालयातील एक महिला पैशाची मागणी करते. हा कुठला न्याय? ही कसली लोकशाही व कसले सरकार? असा सवाल करत आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) यांना धारेवर झाले. 

खेड ते आळेफाटादरम्यानच्या महामार्ग रुंदीकरणाचे काम तातडीने सुरू करावे, भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळावा, महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत चाळकवाडी येथील टोलवसुली बंद करावी आदी मागण्यांसाठी तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसने अतुल बेनके यांच्या नेतृत्वाखाली १५ जुलै रोजी चाळकवाडी टोल नाक्‍यावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यास परिसरातील ग्रामपंचायत व विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

याबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी (ता.१०) सकाळी साडेदहा वाजता येथील शासकीय विश्रामगृहात बाधित शेतकऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) रेश्‍मा माळी, दीक्षा चंद्राकर, उपविभागीय अधिकारी देशमुख, तहसीलदार किरण काकडे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प अधिकारी दिलीप शिंदे, बेनके, शरद लेंडे, तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सूरज वाजगे, सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड आदी उपस्थित होते.

माजी सभापती रघुनाथ लेंडे, सरपंच विक्रम भोर, जिल्हा दूध संघाचे संचालक बाळासाहेब खिलारी, मुकेश वाजगे, संभाजी ब्रिगेडचे रमेश हांडे, वरुण भुजबळ यांनी चुकीचे भूसंपादन, अधिकाऱ्यांकडून होणारी अडवणूक, नारायणगाव येथील बाह्यवळणाचे थांबलेले काम, काम अपूर्ण असताना सुरू केलेली टोलवसुली आदी प्रश्‍न उपस्थित करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने शेतकरी संतप्त झाले. देशमुख बैठकीतून निघून गेल्याने संतप्त शेतकऱ्यांनी त्यांचा निषेध केला. 
भुजबळ यांनी भूसंपादनाचे पैसे मंजूर करण्यासाठी एका महिलेने वीस हजार रुपयांची मागणी केल्याचे सांगितले.

माळी व चंद्राकर यांनी भूसंपादनाच्या तक्रारी सोडविण्यासाठी दर गुरुवारी अधिकारी नारायणगाव येथील मंडल कार्यालयात उपस्थित राहतील, असे सांगितले. 

...अन्यथा टोलवसुली बंद 
अतुल बेनके यांनी भूसंपादनाचा प्रश्‍न सोडवा. महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत टोलवसुली बंद करावी; अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १५ जुलै रोजी टोलवसुली बंद केली जाईल, असा इशारा दिला. 

Web Title: Land Acquisition Remuneration issue government farmer