
वेल्हे : पाबे (ता. वेल्हे) घाटामध्ये आज (ता.२२) रोजी सायंकाळी कोसळलेली दरड सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्काळ हटवण्यात आली आहे मात्र नागरिकांनी या घाटामधून रात्रीचा सावधानतेने प्रवास करावा असे आवाहन वेल्ह्याचे तहसीलदार दिनेश पारगे यांनी केले आहे.
गेल्या एक-दोन दिवसांपासून तालुक्यामधील घाटमाथ्यावर पडत असलेल्या कमी अधिक पावसामुळे पाबे घाटामध्ये रांजणे गावाकडून वेल्ह्याकडे येणाऱ्या मार्गावर घाटामध्ये दरड कोसळली होती. तर घाट माथ्यावरील झाडे उन्हाळून रस्त्यावर आली होती याने वेल्ह्याकडे येणारा मार्ग बंद झाला होता.
याबाबत तहसीलदार दिनेश पारगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना सूचना देताच या ठिकाणाची दरड रात्री साडेआठ वाजेपर्यंत हटवण्याचे काम सुरू करण्यात आले होते. जेसीबीच्या सहाय्याने येथील दरड हटवण्याचे काम पूर्ण झाले असून रस्ता वाहतुकीस मोकळा झाला असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.
मात्र कोसळलेल्या दरडीच्या ठिकाणी अद्यापही एक दोन झाडे खाली येण्याची शक्यता निर्माण झाली असून पुण्याकडून वेल्ह्याकडे येणारा हा जवळचा मार्ग असून गणपती गौरीच्या सणांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक प्रवास करत आहेत.
या ठिकाणी गाडी चालवताना अधिक करून रात्रीच्या वेळी नागरिकांनी प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन तहसीलदार दिनेश पारगे यांनी केले आहे . याबाबत तहसीलदारांनी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच वनविभागास उद्या सकाळी घटनास्थळी जाऊन धोकादायक झाडे काढण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.