लांडगे नाट्यगृहाला अतिक्रमणांचा विळखा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

भोसरी - येथील सर्व्हे क्रमांक एकमधील गायरानाला आणि कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाला अनधिकृत टपरीधारकांच्या अतिक्रमणामुळे बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. या टपरीधारकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

भोसरी - येथील सर्व्हे क्रमांक एकमधील गायरानाला आणि कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाला अनधिकृत टपरीधारकांच्या अतिक्रमणामुळे बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. या टपरीधारकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

भोसरीतील सर्व्हे क्रमांक एकमधील गायरानावर अनधिकृत भाजी मंडई भरते. या भागात टपऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे-नाशिक महामार्गाचा सेवारस्ता विक्रेत्यांनी व्यापला आहे. या ठिकाणी येणारे ग्राहक रस्त्यावरच वाहने लावतात. धावडेवस्तीतून या मार्गाने उलट दिशेने वाहने येतात.कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहालाही अनधिकृत टपरीधारकांचा वेढा पडला आहे. या टपऱ्या प्रवेशद्वारापर्यंत आहेत. भोसरी-आळंदी रस्ता चौक ते नाट्यगृह रस्त्यावर हातगाड्या, टेंपो, खासगी प्रवासी वाहने थांबलेली असतात. जवळच बीआरटीसचे टर्मिनल आहे. या रस्त्याचा एक पदर बीआरटी बसथांब्याने व्यापला आहे. एका पदरावर बस थांबलेल्या असतात. दोन पदरावर विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहनांसाठी फक्त एक पदरी रस्ताच शिल्लक राहतो. त्यातून येथे नेहमीच कोंडी झालेली दिसते.

गायरानावर अतिक्रमण झाल्यामुळे ही जागा ताब्यात घेण्यासाठी गावकऱ्यांनी केलेले आंदोलन वाया गेले. या ठिकाणी टपऱ्या उभारून हप्ते वसुली सुरू आहे. बेकायदा टपरीधारकांवर पालिकेने कडक कारवाई केली पाहिजे. 
- ॲड. नितीन लांडगे, नगरसेवक 

पीएमटी चौक ते धावडे वस्तीपर्यंतच्या रस्त्यावरील व पदपथावरील अतिक्रमणांवर सोमवारपासून (ता. २१) कारवाई करण्यात येणार आहे. 
- नितीन कापडणीस, ई-क्षेत्रीय प्रभाग अधिकारी

Web Title: landage auditorium encroachment