कात्रज घाटात दरड कोसळली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

कात्रज घाटातील जुना बोगदा परिसरात मंगळवारी सकाळी दरड कोसळली. सुदैवाने त्या मार्गावर वाहने नव्हती त्यामुळे दुर्घटना टळली. तासाभरानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली आणि मोठे दगड बाजूला हटविण्यात आले.

कात्रज - कात्रज घाटातील जुना बोगदा परिसरात मंगळवारी सकाळी दरड कोसळली. सुदैवाने त्या मार्गावर वाहने नव्हती त्यामुळे दुर्घटना टळली. तासाभरानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली आणि मोठे दगड बाजूला हटविण्यात आले.

जुना कात्रज बोगदा परिसरातील अखेरच्या वळणावरील उंच तटापासून सुटलेले दगड मार्गालगत कोसळले. त्यासोबत आलेला राडारोडा इतस्ततः पसरला होता. तब्बल तीस फूट उंचावरून मोठे दगड कोसळले तेव्हा मार्ग रिकामा होता, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. 
दगड आणि राडारोड्यामुळे मार्ग दहा फूट व्यापून गेला होता. उर्वरित वीस फूट मार्गातून वाहने जात राहिल्याने वाहतूक खोळंबली. तासाभराने घटनास्थळी आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दगड आणि राडारोडा बाजूला केला.

जुना बोगदा आणि परिसराचा तट ठिसूळ 
कात्रज जुना बोगदा आणि परिसराचा तट ठिसूळ झाला आहे. येथे तीन वर्षांपूर्वी मोठा दगड कोसळून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. बोगद्यावरचा राडारोडा खासगी बस आणि टेंपोवर पडला होता. त्यानंतर दोन दगड मार्गावर पडल्याने झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Landslide collapsed Katraj Ghat