पुणे, मुंबई दरम्यानच्या सर्व रेल्वेगाड्या दोन दिवस रद्द

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

मंकी हिल-ठाकुरवाडीजवळ रेल्वे रुळ खचल्याने तसेच दरडी पडण्याच्या घटनांमुळे रेल्वे वाहतुकीसाठी घाट बंद झाला असून पुणे आणि मुंबई दरम्यान सर्व रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

लोणावळा : मंकी हिल-ठाकुरवाडीजवळ रेल्वे रुळ खचल्याने तसेच दरडी पडण्याच्या घटनांमुळे रेल्वे वाहतुकीसाठी घाट बंद झाला असून, पुणे आणि मुंबई दरम्यान सर्व रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

रेल्वे प्रशासनाच्या वतीने रेल्वे रुळावर आलेले भले मोठे दगड, मातीचा ढिगारा हटविण्याचे काम सुरु असून, रेल्वे सेवा लवकरच पुर्वव्रत होण्यास अजून दोन दिवस लागण्याची शक्यता रेल्वेच्या सुत्रांनी व्यक्त केली असून घाटमार्ग पुर्ण सुरक्षित झाल्यानंतरच रेल्वे वाहतूक सुरु होईल अशी आशा रेल्वे प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

लोणावळा, खंडाळ्यासह घाटमार्गात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर बोरघाटात ठाकूरवाडीजवळ रविवारी (ता. 4) मध्यरात्री डाऊन लाईनवर दरड कोसळल्याने रेल्वे वाहतुक काही काळ विस्कळीत झाली. सोमवारी पुन्हा मंकी हील ते ठाकुरवाडी दरम्यान दगड रेल्वे मार्गावर आल्याने डाऊन आणि मिडल लाईन बंद झाल्याने पुण्याकडे येणारी रेल्वे वाहतूक खोळंबली होती. त्यात सोमवारी सकाळी मुसळधार पावसामुळे ठाकुरवाडीजवळ अप लाईनवरील रेल्वे रुळ खचल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूकही विस्कळीत झाली.

बोरघाटात दरडींचे सत्र सुरुच आहे. रेल्वे मार्गावरील तिन्ही लाईन बंद झाल्याने पुणे-मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतुक ठप्प झाली आहे. रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने पुणे-मुंबई दरम्यानच्या गाड्यांसह लांब पल्ल्याच्या गाड्या एक तर रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे. त्यात केवळ लोणावळा ते पुणे दरम्यान लोकलसेवा सुरु असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: landslide near thakurwadi mumbai pune railway service haulted