खंडाळ्याच्या घाटात धोका दरडींचा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

* गेल्यावर्षी मंकी हिल परिसरातील ठाकूरवाडीजवळ हुबळी आणि हैदराबाद एक्‍स्प्रेसवर दरड कोसळली होती. 
* यंदा खंडाळा परिसरात दोन वेळा या घटना घडल्या. 
* रेल्वे प्रशासनाकडून अद्याप या परिसराचे ड्रोन सर्वेक्षण केलेले नाही. 
* लोणावळा ते कर्जत दरम्यान घाट परिसरात 22 किलोमीटरचा लोहमार्ग. 
* 1999 मध्ये पावसाळ्यात दहा वेळा दरड कोसळण्याच्या घटना. 

पिंपरी - खंडाळा परिसरातील लोहमार्गालगत असणाऱ्या डोंगरावर सैल झालेले खडक, संततधार पडणाऱ्या पावसाचा निचरा होण्यासाठी व्यवस्था नसल्यामुळे भुसभुशीत झालेली माती यामुळे या भागाची स्थिती "भय इथले संपत नाही', अशी झाली आहे. घाट परिसरातून जाणाऱ्या लोहमार्गावर दरड कोसळण्याचा धोका कायम असल्याची बाब "सकाळ'ने केलेल्या पाहणीमध्ये समोर आली आहे. 

खंडाळा भागातील ही दरड काढण्याचे काम गेल्या चार दिवसांपासून अहोरात्र सुरू आहे. लोहमार्गालगत कोसळलेली दरड काढण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांना बऱ्याचवेळा अर्धा ते पाऊण तासाचा ब्लॉक घ्यावा लागत असून, 300 हून अधिक कर्मचारी हे काम करत आहेत. 

लोणावळ्यापासून कर्जतपर्यंतच्या घाट परिसरातील प्रत्येक डोंगरानजीक भूस्थिती वेगवेगळी आहे. डोंगरमाथ्यावरील दगड सैल झालेले आहेत. वृक्षांच्या मुळांमुळे या दगडांचे आधारही सुटू लागले आहेत. पावसामुळे भूस्खलन होत असल्याने माथ्यावरील दगड सुटून दरीच्या दिशेने जातात. यामध्ये लोहमार्ग येत असल्यामुळे दरडींचा धोका कायम असल्याचे दिसून आले आहे. 

लोहमार्गालगत दरड कोसळण्याच्या घटना घडत असताना रेल्वे प्रशासनाकडून त्याबाबत ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर दरड कोसळण्याचे प्रकार झाले होते. त्यानंतर याठिकाणी सुरक्षारक्षक जाळ्या लावण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र, वर्षभरात लोहमार्गावर बोगद्याच्या अलीकडे तीन वेळा दरड कोसळूनही लोहमार्गावरील धोकादायक ठिकाणी सुरक्षा जाळ्या बसविण्याची योजना रेल्वेने हाती घेतलेली नाही. 

* गेल्यावर्षी मंकी हिल परिसरातील ठाकूरवाडीजवळ हुबळी आणि हैदराबाद एक्‍स्प्रेसवर दरड कोसळली होती. 
* यंदा खंडाळा परिसरात दोन वेळा या घटना घडल्या. 
* रेल्वे प्रशासनाकडून अद्याप या परिसराचे ड्रोन सर्वेक्षण केलेले नाही. 
* लोणावळा ते कर्जत दरम्यान घाट परिसरात 22 किलोमीटरचा लोहमार्ग. 
* 1999 मध्ये पावसाळ्यात दहा वेळा दरड कोसळण्याच्या घटना. 

लोणावळा, खंडाळा परिसरात तीन लोहमार्ग आहेत. या मार्गांवर दरड कोसळण्याची घटना घडल्यानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवण्यास प्रशासन प्राधान्य देत आहे. घाट भागातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी सातत्याने गस्त सुरू असते. दरड कोसळण्याच्या घटनांची रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली असून, त्यावर उपाययोजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. 
- अनिल जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई विभाग 

Web Title: Landslide Risk in Khandala Ghat