#PuneTheater रंगमंदिरांत आता खर्चाची ‘नाटके’

Large expenditures on the municipal theater in pune
Large expenditures on the municipal theater in pune

पुणे - महापालिकेच्या रंगमंदिरांतील व्यवस्थेवर भरमसाट खर्च होऊनही ती सुधारताना दिसत नाहीत. अनेक रंगमंदिरांत ऐन कार्यक्रमात खुर्च्यांपासून, वीज- ध्वनियंत्रणा आणि जनरेटरमुळे खोळंबा झाल्याच्या तक्रारी असतात. खरेतर रंगमंदिरांतील विद्युत यंत्रणेबरोबरच ट्रॉन्सफॉर्मरच्या दुरुस्तीवर एकाच वर्षात सात कोटी रुपये खर्च झाले आहेत. देखभालीचा खर्च दरवर्षीच होतो, असे रंगमंदिरांचे व्यवस्थापक सांगतात, त्यामुळे रंगमंदिरांत नाट्यप्रयोगांपेक्षा यंत्रणेवरील खर्चाची ‘नाटके’च अधिक होत असल्याचे दिसते.

शहरात बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासह महापालिकेची अकरा सांस्कृतिक केंद्रे असून, त्यापैकी पाच केंद्रांत कार्यक्रम होतात. मात्र, या रंगमंदिरातील दिवे, ध्वनी आणि वातानुकूलित यंत्रणेतील बिघाडाच्या तक्रारी नेहमीच्याच आहेत. वेळोवेळी देखभाल- दुरुस्ती करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. या केंद्रांमधील कामांसाठी दरवर्षी महापालिका ४० ते ४२ कोटी रुपयांचा निधी राखून ठेवते. मात्र, त्यौपकी ७० टक्के निधी स्वच्छता, छोटी बांधकामे आणि विजेबाबतच्या कामावर खर्च होत असल्याचे दिसून आले, त्यासाठी ठेकेदाराची नेमणूक करण्यात येते. 

कामांच्या नावांत बदल
महापालिकेच्या दाव्यानुसार सर्व सांस्कृतिक केंद्रांत महिन्याकाठी ५० ते ५५ लाख रुपयांची वीजविषयक कामे करावी लागतात. तो खर्च दाखवताना केवळ कामांच्या नावांत बदल केला जातो. दिवाबत्तीचा खर्च म्हणून सगळीच कामे केली जातात; परंतु साहित्य खरेदीचा खर्च पुन्हा वेगळा दाखविण्यात आला आहे. टॉन्सफॉर्मर जळण्याच्या घटनांमधून हा खर्च वाढत गेल्याचे हिशेबातून स्पष्ट होत आहे. 

कामे न करताच बिले?
रंगमंदिरांमधील ध्वनियंत्रणा प्रचंड महागडी असल्याचे आढळून आले आहे. सर्व रंगमंदिरांत या यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी वर्षाला पाऊण लाख रुपये लागतात. यंदा तो खर्च ६३ लाख रुपयांपर्यंत गेल्याचे दिसत आहे. ज्या रंगमंदिरात कार्यक्रमच झाले नाहीत, त्याही ठिकाणची ध्वनियंत्रणा दुरुस्त केल्याच्या नोंदी आहेत. अर्थात, यामुळे कामे न करताच केवळ बिले काढल्याचा संशय आहे. 

व्हीआयपी कक्षावर अधिक खर्च
रंगमंदिरांच्या कलाकार आणि ‘व्हीआयपी’ कक्षांतील यंत्रणेच्या कामांसाठीच अधिक खर्च होत असल्याचे रंगमंदिर व्यवस्थापक सांगतात. तेथील ‘एसी’ची नियमित दुरुस्ती करावीच लागते. हे कक्ष पूर्णवेळ उपलब्ध असतात, त्यामुळे ‘एसी’साठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली असून, ती वर्षाला दीड कोटी रुपयांची आहे.

सांस्कृतिक केंद्रातील विद्युत यंत्रणेत छोटासाही बिघाड होऊ नये, याची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे नियमित कामे करावी लागतात. काही रंगमंदिरामध्ये नेहमीच कार्यक्रम होतात. त्याचाही परिणाम व्यवस्थेवर होतो. त्यामुळे गरजेनुसार वर्षभर कामे केली जातात. 
- सुरेश मते, व्यवस्थापक, सांस्कृतिक केंद्र, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com