पुणे जिल्ह्यातील या तालुक्यांत कोरोनाचा धुमाकूळ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 August 2020

 पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा धुमाकूळ सुरूच आहे, आजही जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. तसेच, काहींचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 

पुणे : पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा धुमाकूळ सुरूच आहे, आजही जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. तसेच, काहींचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.  

अरे वा, 95 वर्षांच्या आजीबाईंची कोरोनावर मात 

शिरूरला तीन दिवसांत पाच जणांचा मृत्यू 
शिरूर :
शिरूर तालुक्यात आज दिवसभरात तालुक्यातील नऊ गावांतील 26 जणांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. मात्र, कालप्रमाणेच आजही दोघांचा मृत्यू झाल्याने तीन दिवसांतील मृतांची संख्या पाच झाली आहे. आज शहरातील एका ज्येष्ठ नागरिकाचा आणि तळेगाव ढमढेरे येथील एका सामाजिक कार्यकर्त्याचा कोरोनाने जीव गेला. आज येथील कोवीड केअर सेंटरमधून बाधितांच्या संपर्कात आलेल्या सत्तर जणांचे स्वॅबचे नमूने तपासणीसाठी पाठविले आहेत. आजअखेर तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 783 झाली असून, आज शहराच्या विविध भागातील पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. त्याचबरोबर सणसवाडी व डिंग्रजवाडी येथूनही प्रत्येकी पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. त्या खालोखाल रांजणगाव गणपती व शिक्रापूर या 'हॉटस्पॉट'मधून प्रत्येकी तिघांना कोरोनाची बाधा झाली असून, कोरेगाव भीमा येथे दोन रूग्ण सापडले आहेत. धामारी, गणेगाव खालसा व कारेगाव येथील प्रत्येकी एकाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. शहरात आज दिवसभरात सय्यदबाबा नगरातील तीस वर्षीय पुरूष व रेव्हेन्यू कॉलनीतील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरीकाबरोबरच; मुंबई बाजार परिसरात 55 वर्षीय पुरूष, 24 वर्षीय तरूण व 28 वर्षीय महिला अशा तिघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मारूती आळी परिसरातील 62 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. 

शेतकऱ्यांसाठी खूशखबर, दौंडमध्ये मुगाचे दिवसाआड लिलाव

दौंडमध्ये ८० टक्के रुग्ण बरे
दौंड :
दौंड तालुक्यातील कोरोना विषाणू बाधितांचा आकडा साडेसहाशेच्या जवळ आला असून, ८०.२० टक्के बाधित नागरिक उपचारानंतर बरे झाले आहेत. बरे होणाऱ्या रूग्णांचे प्रमाण वाढत असले तरी मृतांचा आकडा वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. २९ एप्रिल ते १२ ऑगस्ट या कालावधीत तालुक्यात तब्बल ६४७ बाधितांपैकी ५२२ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. तालुक्यात सक्रिय बाधितांची संख्या १०० असून, त्यामध्ये दौंड शहरातील ४२ व ग्रामीण भागातील ५८ नागरिकांचा समावेश आहे. आज राहू (ता. दौंड) येथील एका ५३ वर्षीय नागरिकास बाधा झाली.

मुळशीत रुग्णसंख्या 840 
पिरंगुट :
 मुळशी तालुक्‍यातील कोरोनाबाधितांची संख्या आता साडेआठशेच्या उंबरठ्यावर पोचली आहे. गुरुवारी तालुक्‍यात नवीन 19 रुग्ण आढळले. त्यामुळे तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या 840 झाली आहे. तालुक्‍यात बावधन, अकोले येथे प्रत्येकी 4, म्हाळुंगे, सूस, भूगाव, उरवडे येथे प्रत्येकी 2, चांदे, भरे, मारुंजी येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला. बरे झालेल्या 9 रुग्णांना घरी सोडले. 

आंबेगावात 17 नवीन रुग्ण 
मंचर :
आंबेगाव तालुक्‍यात गुरुवारी 17 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तालुक्‍यातील पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 477 झाली आहे. सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण मंचर शहरात सात आढळून आले आहेत. पारगाव निघोटवाडी येथे प्रत्येकी दोन, चास, कळंब अवसरी खुर्द, जवळे, घोडेगाव, गिरवली येथे प्रत्येकी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. दरम्यान, मास्क न वापरणाऱ्यांच्या विरोधात पोलिस कारवाई करण्याची मोहीम अजून तीव्र करणार, असा इशारा मंचरचे पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे व घोडेगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिला आहे. 

जुन्नर तालुक्‍यात नवीन तेरा रुग्ण 
जुन्नर :
जुन्नर तालुक्‍यात गुरुवारी नारायणगाव- 4, बेल्हे, मंगरूळ, पेमदरा, वारूळवाडी, रोहोकडी, शिरोली बुद्रुक, वडज, निमगावसावा, व जुन्नर शहर प्रत्येकी एक असे एकूण तेरा नवीन रुग्ण आढळून आले. यामुळे एकूण रुग्ण संख्या 558 झाली असून यापैकी 437 बरे झाले आहेत. विविध रुग्णालयात 96 रुग्ण उपचार घेत असून कोरोना संसर्गामुळे 25 जणांचा मृत्यू झाला आहे. 

पुरंदरमध्ये ज्येष्ठ महिलेचा मृत्यू                                                             सासवड : पुरंदर तालुक्यातील सासवड शहरातील 74 वर्षीय एक ज्येष्ठ महिला आज कोरोनाबाधीत स्थितीत मृत पावली. त्यातून कोरोना बळींचा शहराचा आकडा 11 वर आणि पुरंदर तालुक्याचा बळींचा आकडा आज 27 वर गेला. तरीही तालुक्यातील  कोरोनाबाधीत संख्या आजअखेर 681 व सासवड शहरातील रुग्ण संख्या 302 वर पोचली. मागील दिड आठवड्यापूर्वी संसर्गाचा वेग चक्रावून टाकणारा होता. आता थोडा लगाम बसला आहे. तालुक्यात आज दिवसभरात फक्त चारच रुग्णामुळे दिलासा मिळाला.  

खेडमध्ये 55 जणांना संसर्ग 
राजगुरूनगर :
खेड तालुक्‍यात कोरोनाचा कहर सुरूच असून, गुरुवारी 55 कोरोनाबधित आढळले. एकूण रुग्णसंख्या 1946 झाली आहे. तालुक्‍यात आज दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. बी. गाढवे यांनी दिली. भाजपचे जिल्हा परिषद सदस्य, खेड तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे ते सध्या क्वारंटाइन झाले आहेत. चाकणला 65 वर्ष वयाच्या, तर आळंदीला 92 वर्षिय ज्येष्ठाचे बुधवारी कोरोनामुळे निधन झाले. गेल्या 24 तासांत चाकणला 11, आळंदीत 2, राजगुरूनगरला 16 रुग्णांची भर पडली. ग्रामीण भागात मरकळला चार, कुरुळी, कान्हेवाडी, काळूस, धानोरे, चऱ्होली, राक्षेवाडी येथे प्रत्येकी 2, कुरकुंडी, निघोजे, मेदनकरवाडी, चिंबळी, आंबेठाण, शेलपिंपळगाव, शेलगाव, भोसे, कनेरसर, रेटवडी येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला. 

बारामतीत ओलांडला तीनशे रुग्णांचा टप्पा 
बारामती :
कोरोनाच्या रुग्णांनी गुरुवारी तीनशेचा टप्पा ओलांडला. रुग्णसंख्या आटोक्‍यात ठेवण्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करण्याची गरज आता नागरिक व्यक्त करत आहेत. बारामतीतील रुग्णसंख्या आता 308 वर जाऊन पोचली आहे. बुधवारी रात्री बारामती ग्रामीण येथील एका ज्येष्ठ नागरिकाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता 21 वर जाऊन पोचली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 134 वर जाऊन पोचली असून 153 रुग्ण कोरोनाबाधित असल्याने रुग्णालयात उपचार घेत आहेत. नगरपालिकेने घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले असले तरी रुग्ण संख्या कमी होत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Large increase in the number of corona patients in Pune district