विद्यार्थ्यांची पसंती पुण्यालाच; अॅडमिशनवर कोरोनाचा कसलाही परिणाम नाही!

Online_Admission
Online_Admission

पुणे : 'कोरोना'मुळे विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात बाहेरचे विद्यार्थी प्रवेश घेतील का? अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र, गेल्या चार-पाच दिवसातील चित्र आशादायक असून, भरपूर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. आणखी १० दिवस या लिंक ओपन असणार आहेत. 

इयत्ता १२वीचा निकाल लागल्यानंतर पदवी प्रवेशासाठी महाविद्यालयांनी तयारी केली आहे. जवळपास सर्वच महाविद्यालयांनी अर्ज भरण्यासाठी गर्दी नको म्हणून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. पहिल्या दिवसापासूनच मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहेत. यात कोकण, मराठवाडा, सातारा, नगर भागातून अर्ज येत आहेत, त्यापैकी आता कितीजण प्रवेश घेतील, याकडे लक्ष लागले आहे. 

माॅडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव म्हणाले, "कोरोना असला तरी पुढील काळात लस उपलब्ध होईल, या विचाराने विद्यार्थी आशावादी आहेत. पुण्याबाहेरील विद्यार्थी अर्ज करत आहेत. यामध्ये कोकण, लातूर आणि मराठवाड्याच्या इतर भागातील विद्यार्थी जास्त आहेत. आतापर्यंत २ हजार ऑनलाईन अर्ज आले आहेत."

रास्ता पेठ येथील फोरसाईट काॅलेज ऑफ काॅमर्सचे प्राचार्य एम. डी. लाॅरेन्स म्हणाले, "आमच्याकडे बीबीए (आयबी), बीबीए (काॅम्युटर अप्लिकेशन), बीकाॅम यासाठी विद्यार्थी अर्ज करत आहेत. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचीही योजना आहे. पुण्यातील कोंढवा, हडपसर यासह बारामती, फलटण, सातारा येथून विद्यार्थी अर्ज करत आहेत."

"आत्तापर्यंत दीड हजार अर्ज आलेले आहेत, आणखी काही दिवस मुदत असल्याने विद्यार्थी अर्ज करतील. दरवर्षीप्रमाणे यंदाही चांगला प्रतिसाद आहे," असे स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप सेठ यांनी सांगितले. 

गरवारेचे प्रवेश २४ जुलै पासून
१२ वीचा निकाल लागल्यानंतर गरवारे महाविद्यालयाने बीएससी, बीएचे सध्या इनहाऊस प्रवेश निश्चित करण्याचे काम सुरू केले आहे. २४ जुलैपासून बाहेरील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, असे प्राचार्य पी. बी. बुचडे, तर बी.काॅम.साठीची प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे, असे गरवारे काॅमर्स महाविद्यालयाच्या प्राचार्या गीता आचार्य यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com