पुण्यातल्या लॉकडाउनवरून खासदार बापट यांचा अजित पवारांना टोला; पाहा काय म्हणाले!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 July 2020

राज्यात जेव्हा पहिला लॉकडाऊन झाला, तेव्हा आम्ही राज्य सरकारला मदत केली, पण दुसऱ्यांदा लाॅकडाऊन करून काही साध्य होताना दिसत नाही.

पुणे : लॉकडाउनमुळे पुणे शहरातील कोरोनाला कुठे प्रतिबंध घालता येतो काय, असा सवाल करत पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी अप्रत्यक्षपणे पालकमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे. मग पुन्हा लॉकडाउन का लावला, हे ज्यांनी लावला त्यांनाच विचारले पाहिजे असे म्हणत त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. यामुळे पुणे शहरातील कोरोना संसर्गावरून आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये जुंपली आहे.

काय करावं या पुणेकरांचं? सगळं बंद तरीही रस्त्यावर वर्दळ सुरूच!​

राज्यात जेव्हा पहिला लॉकडाऊन झाला, तेव्हा आम्ही राज्य सरकारला मदत केली, पण दुसऱ्यांदा लाॅकडाऊन करून काही साध्य होताना दिसत नाही. यापेक्षा टेस्टिंग वाढविणे गरजेचे आहे. शिवाय रुग्णालयांना ज्या महत्वाच्या गोष्टी कमी पडतील, त्या तातडीने पुरविणे गरजेचे आहे. यापुढे लाॅकडाऊन वाढविला, तर भाजप आपली भूमिका योग्य वेळी मांडेल, असेही बापट यांनी यावेळी सांगितले.

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज पुणे शहर आणि जिल्ह्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना याबाबतचे निवेदन आणि प्रतिकात्मक स्वरुपात दूधाच्या पिशव्या भेट दिल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना बापट यांनी पवार यांच्यावर हा निशाणा साधला. 

हद्द झाली! पतंग उडविण्यास विरोध केल्याने 'त्या' तिघांनी काय केलं पाहा​

यावेळी  भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, आरपीआयचे (ए) शहराध्यक्ष अशोक शिरोळे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शिवसंग्रामचे शहराध्यक्ष भरत लगड, रासपचे शहराध्यक्ष सनी रायकर, शहर भाजपचे सरचिटणीस राजेश येनपुरे, दीपक नागपुरे, आरपीआय पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शहराध्यक्ष मुळीक म्हणाले, "कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या लॉकडाउनच्या स्थितीत महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. या शेतकऱ्यांना प्रति लिटर १० रुपयांप्रमाणे थेट अनुदान मिळाले पाहिजे. हे अनुदान त्यांच्या बॅंक खात्यावर जमा करावे. दूध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रति किलो ५० रुपये अनुदान द्यावे. गायीच्या दूधाला प्रति लिटर ३० रुपये भाव द्यावा. या मागण्या येत्या ३१ जुलैपर्यंत राज्य सरकारने पूर्ण कराव्यात. अन्यथा १ ऑगस्ट २०२० ला राज्यव्यापी आंदोलन केले जाईल."

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Girish Bapat criticized Ajit Pawar over lockdown in Pune