esakal | पोलीस भरतीत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी अपात्र
sakal

बोलून बातमी शोधा

पोलीस भरती

पोलीस भरतीत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी अपात्र

sakal_logo
By
मिलिंद संगई ः सकाळ वृत्तसेवा

बारामती : राज्यात सुरु असलेल्या पोलिस भरतीत अनेक विद्यार्थी अपात्र ठरत असल्याने उमेदवारांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. डिसेंबर 2019 मध्ये फॉर्म भरलेल्या उमेदवारांची पोलीस भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये 3450 जागा, पोलीस वाहनचालक (ड्रायव्हर) पदासाठी 1019 जागा व राज्य राखीव बल पोलीस शिपाई (एसआरपीएफ) या पदासाठी 828 पदे अशी एकूण 5297 पोलीस पदांची भरती प्रक्रिया सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे.

या भरती प्रक्रियेत वाहन चालविण्याचा वैध परवाना नसणे, विविध मुदतीतील नॉन क्रिमेलियर, डोमेसाईल प्रमाणपत्र नसणे, आपल्या प्रवर्गाला जागा नसतानाही फॉर्म भरणे इत्यादी कारणाने मोठ्या संख्येने उमेदवार पोलीस भरतीच्या कागदपत्र तपासणीतून बाहेर पडताना दिसत आहेत.

पोलीस वाहनचालक पदांच्या भरती प्रक्रियेत फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंतचे म्हणजेच 8 जानेवारी 2020 या कालावधीच्या आतील प्रमाणपत्र ज्या उमेदवारांकडे नाही. त्या उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर काढण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी साधारणत: एक महिन्यापेक्षा कमी कालावधी होता. एवढ्या कमी कालावधीत हलके वाहन चालवण्याचा (टीआर) परवाना काढणे शक्य नव्हते. त्यामुळे पोलीस वाहनचालक पदाचे स्वप्न बाळगलेले व अडीच वर्षांपासून अभ्यास करत असणारे असंख्य उमेदवार या भरती प्रक्रियेतून बाहेर पडले आहेत.

हेही वाचा: अनिल परबांची कुंडली मांडणारा ज्योतिषी शिवसेनेतलाच - मनसे वैभव खेडेकर

त्याच बरोबर जात प्रमाणपत्र, महाराष्ट्र आदिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल) व नॉन क्रिमेलियर प्रमाणपत्र ही प्रमाणपत्रे मार्च 2020 पर्यंत ग्राह्य असणारी आवश्यक असल्यामुळे कितीतरी उमेदवार या कालावधीतील प्रमाणपत्र सादर न करू शकल्यामुळे या भरती प्रक्रियेला मुकलेले आहेत.

पुणे शहर पोलीस भरतीमध्ये विमुक्त जाती अ, भटक्या जमाती क व ड या प्रवर्गाला जागा नसतानाही त्यांचे फॉर्म आल्यामुळे एकूण 1162 उमेदवार अपात्र करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार आमच्या प्रवर्गाला जरी जागा नसली तरी एक तर आमचा फॉर्म व फी स्वीकरली जायला नको होती किंवा आम्हाला खुल्या प्रवर्गात सामावून घेऊन भरतीची संधी देणे आवश्यक होते.

"गेल्या अनेक वर्षांपासून नियमिपणे पोलीस भरती प्रक्रिया होत आहे. या भरती प्रक्रियेमध्ये ईमेल पासवर्ड बदलण्यापासून ते कागदपत्रांपर्यंत एवढ्या मोठ्या संख्येने पहिल्यांदाच उमेदवार अपात्र झालेले आहेत. पहिल्यांदाच पोलीस वाहनचालक (ड्रायव्हर) पदांची भरती प्रक्रिया होत असल्यामुळे लायसनच्या मुदतीबाबत अधिकृत संकेत स्थळावरून विद्यार्थ्यांना व्यवस्थित सूचना दिल्या गेल्या असत्या तर दोन वर्षे विद्यार्थ्यांनी केलेली तयारी फुकट वाया घालवली नसती व या भरती प्रक्रियेत सहभाग नोंदविलाही नसता."

- उमेश रुपनवर, संचालक, सह्याद्री करिअर अँकॅडमी, बारामती.

loading image
go to top