लेखकांमुळे प्रकाशन संस्था मोठी होते 

लेखकांमुळे प्रकाशन संस्था मोठी होते 

पुणे - ‘‘वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या कसदार लेखकांमुळेच प्रकाशन संस्था मोठी होते; त्यामुळे राजहंस प्रकाशनाचे जे काम उभे राहिले त्यामागे या लेखकांचा आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा मोठा वाटा आहे’’, असे भावपूर्ण मनोगत दिलीप माजगावकर यांनी व्यक्त केले. त्यांच्या पंचाहत्तरीच्या निमित्ताने साहित्यिक, अभ्यासक, प्रकाशक आदींचे एक अनौपचारिक स्नेहसंमेलनच पार पडले. त्यावेळी माजगावकरांनी आपल्या कारकिर्दीचा प्रवास उलगडला. 

यावेळी ‘राजहंस’ची सर्वार्थाने जडणघडण करणाऱ्या ‘माणूस’कार श्री. ग. माजगावकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या स्मृत्यर्थ सात सेवाभावी संस्थांना निधी अर्पण करण्यात आला.  

ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे, लेखिका मंगला आठलेकर, डॉ. सदानंद बोरसे, रेखा माजगावकर व्यासपीठावर उपस्थित होते. साहित्यिक-पत्रकार अंबरिश मिश्र यांचे रसाळ निवेदन आणि विविध वक्‍त्यांची भाषणे यातून माजगावकरांसारख्या प्रकाशकांचे काम सांस्कृतिक जीवन कसे समृद्ध बनवत असते, हे उपस्थितांच्या मनावर ठसले. 

डॉ. ढेरे म्हणाल्या, ‘‘यश-अपयशाचा विचार न करता काम करणाऱ्या संस्थांना समाजाने आपले म्हणावे. त्यांना आर्थिक मदतीची गरज असतेच; पण मानसिक, भावनिक आधाराची जास्त गरज असते.’’ मराठी भाषेच्या संवर्धनासाठीचे प्रयत्न वाढवायला हवेत, असे मत गाडगीळ यांनी व्यक्त केले. डॉ. बोरसे यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. विजया मेहता यांनी व्हिडिओद्वारे भावना व्यक्त केल्या.

या संस्थांना निधी 
वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र (पुणे), अंधश्रद्धा निर्मूलन समिती, वंचित विकास, डांग सेवा मंडळ, डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृत-संशोधन केंद्र, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम, पुणे भारत गायन समाज या संस्थांना निधी देण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com