19 वर्षांमध्ये माजी मंत्र्याने तालुक्यात विकासकामे केली नाहीत : आमदार भरणे

राजकुमार थोरात
शुक्रवार, 8 जून 2018

19 वर्षामध्ये माजी मंत्र्याने तालुक्यामध्ये काहीच कामे केली नसल्यामुळे २०१४ च्‍या विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने धडा शिकवला आहे.

वालचंदनगर :  इंदापूर तालुक्यातील माजी मंत्र्याने 19 वर्षांत तालुक्यामध्ये विकासकामे केली असती तर, 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने मला निवडून दिले असते का ? असा प्रश्‍न उपस्थित करुन आमदार दत्तात्रेय भरणे यांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकेचे झोड उडविली.

बाेरी (ता.इंदापूर) येथील भिसेवस्ती येथे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या सभामंडपाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, बोरीचे सरपंच संदीप शिंदे, भारत शिंदे, रामचंद्र शिंदे,रामभाउ जोरी,ज्ञानेश्‍वर जोरी, सुभाष शिंदे, पांडुरंग वाघमाेडे, हरीभाउ वाघमोडे, साेपान भिसे,संतोष शिंदे, लालासाे भिसे, सोमना भिसे, चंद्रकांत भिसे उपस्थित होते.

यावेळी भरणे यांनी सांगितले, की १९ वर्षामध्ये माजी मंत्र्याने तालुक्यामध्ये काहीच कामे केली नसल्यामुळे २०१४ च्‍या विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने धडा शिकवला आहे. मी विरोधी पक्षाचा आमदार असतानादेखील तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहे. गेल्या शंभर वर्षाच्या इतिहासामध्ये नीरा डाव्या कालव्याला चालू वर्षी उन्हाळ्यामध्ये सर्वार्धिक पाणी आणले आहे. मात्र विराेधक पाण्याच्या प्रश्‍नावरती खोटे बोलून पाण्याचे राजकारण करीत असल्याचा आरोप भरणे यांनी केला.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तीन रस्त्यांसाठी पावणे सहा कोटी रुपयांचा निधी

इंदापूर तालुक्याचा अनुशेष भरुन काढण्यासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक याेजनेतून बाेरी ते भिसेवस्ती रस्त्याच्या कामासाठी सव्वादोन कोटी रुपये, बोरी ते लासूर्णे  रस्त्यासाठी सव्वा कोटी रुपये व बोरी ते अकाेले रस्त्याच्या कामासाठी सव्वा दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे भरणे यांनी सांगितले.

Web Title: In the last 19 years the former minister did not make developmental works in the taluka says MLA Bharane