जिल्हा बँकेत धीरज देशमुख बिनविरोध

जिल्हा बँकेत धीरज देशमुख बिनविरोध
Published on: 

लातूर जिल्हा बँकेवर
धिरज देशमुख बिनविरोध

- विरोधातील दोघांसह १५ जणांचे अर्ज बाद
- विद्यमान संचालक निलंगेकरही निवडणूक रिंगणाबाहेर

ॲग्रोवन वृत्तसेवा
लातूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या छाननीत विद्यमान अध्यक्ष माजी आमदार धीरज देशमुख त्यांच्या विरोधातील दोन्ही उमेदवारांचे अर्ज छाननी बाद झाल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. छाननीत १५ जणांचे अर्ज बाद झाले असून त्यात विद्यमान संचालक अशोक पाटील निलंगेकर यांना दहा वर्षाहून अधिक काळ संचालकपदी राहिल्यामुळे पहिल्यांदाच निवडणूक रिंगणाबाहेर जावे लागले आहे.

दरम्यान, महायुतीच्या पॅनेलमधील मार्केटिंग संस्था मतदारसंघ सोडला तर सर्व बहुतांश उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. यात कराड पितापुत्रांसोबत अरविंद पाटील निलंगेकर यांचाही अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांत समावेश आहे.

बँकेच्या संचालक मंडळांची निवडणूक यंदा विविध कारणांनी गाजत आहे. यात सहकारमंत्री संचालक असलेल्या या बँकेच्या निवडणुकीत महायुतीने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात पॅनेल उभे केले आहे. सहकारमंत्र्यांनी ऐनवेळी सत्ताधाऱ्यांची सोबत केल्यामुळे महायुतीच्या पॅनेलची गोची झाली. तरी महायुती सर्वच मतदारसंघात उमेदवार देण्यात यशस्वी झाली आहे.

निवडणुकीत शेवटच्या मुदतीत ८८ उमेदवारांनी १३९ अर्ज दाखल केले होते. यात अनेकांनी एकापेक्षा जास्त अर्ज दाखल केले होते. सोमवारी (ता. १९) अर्जांची छाननी झाली. मोठ्या संख्येने आक्षेप दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत सुनावणी झाली. निवासी उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी केशव नेटके यांनी बुधवारी (ता. २१) सकाळी अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. त्यानुसार उमेदवारांनी एकापेक्षा जास्त दाखल केलेले तसेच १५ जणांचे अर्ज थकबाकी, सहकारी संस्थेच्या संचालकपदाचा अनुभव नसणे, दहा वर्षापेक्षा अधिक काळ बँकेवर संचालक असणे आदी विविध कारणांमुळे अवैध ठरले आहेत. यात विद्यमान संचालक निलंगेकर यांच्यासह माजी आमदार विनायकराव पाटील यांची मुलगी अबोली जाधव, गोविंदराव माकणे, सोनाली पाटील, विठ्ठलराव पाटील यांचे अर्ज सोसायटी मतदारसंघातून नागरी बँका व पतसंस्था मतदारसंघातून भीमाशंकर राचट्टे, मत्स व दुग्ध संस्था मतदारसंघातून सतीश जाधव, अनुसूचित जाती मतदारसंघातून राणी शिवलीकर, इतर मागासवर्गीय मतदारसंघातून भरत चामले व अमित शेळके तर महिला प्रतिनिधी संघातून मनोरमा पाटील व अबोली जाधव यांचे अर्ज अवैध ठरले आहेत. मार्केटिंग संस्था मतदारसंघातून भरत चामले व सचिन पाटील यांचे अर्ज बाद झाल्यामुळे विद्यमान अध्यक्ष देशमुख यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

-------चौकट ----
अर्ज मागे घेण्यासाठी पंधरा दिवस

आमदार रमेशअप्पा कराड व मुलगा ऋषिकेश कराड यांचे अर्ज नागरी बँका व पतसंस्था व विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघातून वैध ठरले आहेत. माजीमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर यांचा अर्ज निलंगा तर आमदार अभिमन्यू पवार यांच्या पत्नी शोभा पवार यांचा अर्ज औसा सोसायटी व महिला प्रतिनिधी मतदारसंघातून वैध ठरला आहे. विद्यमान संचालक अशोक गोविंदपूरकर यांचा अर्ज नागरी बँका व पतसंस्था मतदारसंघातून वैध ठरला आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत ४ नोव्हेंबर असून बुधवारी पहिल्याच दिवशी शोभा पवार यांनी महिला प्रतिनिधी मतदारसंघातून तर युवराज बिराजदार यांनी औसा सोसायटी मतदारसंघातून आपला अर्ज मागे घेतला. अर्ज मागे घेण्यासाठी १५ दिवस असल्यामुळे शेवटच्या दिवशीच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान १८ जागांसाठी ७१ उमेदवार शिल्लक असून या सर्व जागेवर महायुतीने दिलेल्या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com