चिंचवड विधानसभा मतदारसंघातून लक्ष्मण जगतापांची विजयाची हॅटट्रिक | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

भाजपच्या लक्ष्मण जगताप यांनी विजयी हॅटट्रिक साधली. त्यांची लढत शिवसेनेतील बंडखोर राहुल कलाटे यांच्याशीच पुन्हा झाली.

सुवर्णा नवले  
पिंपरी - चिंचवड विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी बाजी मारली. एक लाख पन्नास हजार २३ मते मिळवीत जगतापांनी विजयाची हॅटट्रिक केली. ‘पुन्हा भाऊ.. पुन्हा भाऊ..च’ म्हणत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यंदाची निवडणूक चुरशीची ठरली. तिसऱ्यांदा विजयी झाल्याने लक्ष्मण जगताप यांच्या मंत्रिपदाची आशा पल्लवित झाल्या आहेत. 

मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीत २८६ मतांनी राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष राहुल कलाटे आघाडीवर होते. मात्र, दुसऱ्या फेरीनंतर चित्र बदलले. ३८ हजार मतांच्या फरकाने आघाडी मिळवत चिंचवडची परंपरा भाजपने कायम राखली. दुसऱ्या फेरीपासून जगताप यांनी आघाडी घेतली. ती शेवटपर्यंत टिकून ठेवली. जसजसे मताधिक्‍याने आकडे वाढत गेले तसतशी चिंचवडमध्ये विजयाचे वारे वाहू लागले. कलाटे यांना एक लाख १२ हजार २२५ मते मिळाली. त्यांनी जगताप यांना चांगलीच टक्कर दिली. नागरिकांनी मतदानातून  नाराजी व्यक्त केली. जगताप यांना टपाली मतांमध्ये २३५ आणि कलाटे यांना २३१ मते मिळाली आहेत.  

दुसऱ्या फेरीपासून लक्ष्मण जगताप आघाडीवर राहिले. अठराव्या फेरीनंतर उमेदवार जगताप व कार्यकर्त्यांनी मतमोजणीच्या ठिकाणी भंडारा उधळून जल्लोष केला. जगताप गाडीतून उतरताच त्यांचे बंधू शंकर जगताप यांनी त्यांना मिठी मारली. जगताप यांच्या मातुःश्री, पत्नी व बहीण यांनी त्यांना पेढे भरवून आनंद साजरा केला. जनतेचे आभार मानून जगताप यांनी श्री मोरया गोसावी मंदिरात जाऊन सहकुटुंब दर्शन घेतले.

-----------------------------------

निसटता विजय
अवधूत कुलकर्णी
भाजपच्या लक्ष्मण जगताप यांनी विजयी हॅटट्रिक साधली. त्यांची लढत शिवसेनेतील बंडखोर राहुल कलाटे यांच्याशीच पुन्हा झाली. मागील वेळी ते शिवसेनेकडून लढले होते. या वेळी ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. सुरवातीच्या टप्प्यात त्यांची ‘एकला चला रे’ स्थिती होती. नंतर महाआघाडीच्या अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने त्यांना राष्ट्रवादीने पुरस्कृत उमेदवार, असे जाहीर केले. मात्र, ही निवडणूक चुरशीची होईल, असे संकेत मिळाले. त्यानुसार तोडीस तोड अशी लढत झाली.

जगताप यांनी कलाटे यांचे आव्हान पेलले. निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी कोणताही धोका पत्करला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांच्यासाठी रहाटणीत प्रचार सभा घ्यावी लागली. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या प्रचारासाठी थेरगावात सभा घेतली. खासदार श्रीरंग बारणे जरी शिवसेनेचे खासदार असले, तरी कलाटे आणि बारणे यांचे राजकीय वैर आहे. त्यामुळे बारणे यांनीही जगताप यांना थेरगाव भागातून चांगले मतदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. जगताप यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या फळीचा उपयोग झाला. रिंगरोड प्रकल्पाला वाल्हेकरवाडी भागातील नागरिकांनी प्रखर विरोध केला होता. त्यामुळे या भागातून जगताप यांना अर्थातच कमी मतदान झाले. या कमी मतदानाचा त्यांच्या मताधिक्‍यावर निश्‍चितच काही प्रमाणात परिणाम झाला.

महाआघाडीचा पाठिंबा मिळाल्याने कलाटे यांचा आत्मविश्‍वास वाढला होता. प्रचाराची जोरदार मुसंडी मारत त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला. काँग्रेसने दिग्गज नेत्यांना कलाटे यांच्या प्रचारात उतरविले असते, तर त्याचाही त्यांना फायदा झाला असता. खासदार अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या सभांचा अपवाद वगळता कलाटे यांच्या प्रचारासाठी कोणताही बडा नेता प्रचारात उतरविण्यात आला नाही. त्याचाही काही प्रमाणात त्यांना तोटा झाला.

दुसरीकडे, या मतदारसंघातील अनधिकृत बांधकामे दंड आकारून नियमित करण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र, यातील जाचक अटींमुळे याचा फायदा फारसा कोणालाही झाला नाही. शहरातील पवना बंद जलवाहिनीचा प्रश्‍न, शहराच्या वाढत्या लोकसंख्येसाठी भामा-आसखेड आणि आंद्रा धरणातून पाणी आणण्याचा प्रश्‍न सत्ताधाऱ्यांना सोडविता आला नाही, यासारखे मुद्दे प्रमुख होते. मात्र, हे मुद्दे प्रभावीपणे मांडून ते मतदारांच्या गळी उतरविण्यात कलाटे यांना अपेक्षित यश लाभले नाही. या निवडणुकीने जगताप यांना पुढील निवडणूक त्यांच्यासाठी सोपी नसल्याचेही संकेत दिले आहेत. आगामी पाच वर्षांत राहुल कलाटे कशा पद्धतीने मोर्चेबांधणी करतात, यावरही बरेच काही अवलंबून आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Laxman Jagtap hat-trick of victory in Chinchwad assembly constituency