"कंगणा, गोखले, गुप्तें विरुध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

"कंगणा, गोखले, गुप्तें विरुध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा"

"कंगणा, गोखले, गुप्तें विरुध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा"

पुणे : अभिनेत्री कंगना राणावत, अभिनेते विक्रम गोखले आणि गायक अवधूत गुप्ते यांनी देशाच्या स्वातंत्र्यावर केलेले आक्षेपार्ह वक्तव्यासाठी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत त्वरित अटक करायला पाहिजे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महात्मा गांधी आणि इतर स्वातंत्र्य वीरांचा अपमान झाला आहे. त्यामुळे आठवड्याभरात या कलाकारांनी देशाची माफी मागावी. माफी न मागितल्यास त्यांच्या घराबाहेर २७ नोव्हेंबरपासून सत्याग्रह आंदोलनासाठी बसणार असल्याचा इशारा ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी दिला.

हेही वाचा: 'शेतकरी- मजुरांच्या विरोधात रचलेलं षडयंत्र हरलंय'

माने म्हणाले, ‘‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक वर्ष संघर्ष करत कित्येकांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मागे सर्व देश एकसंधपणे उभा राहिला आणि इंग्रजांच्या विरोधात स्वातंत्र्याची चळवळ राबवली. त्याकाळातही संघ इंग्रजांसोबत होता. त्यांच्यातील कोणी स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी झाले नाही. आजही संघ देशात पुन्हा हुकूमशाही व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा हे कलाकार यांना नागपूरच्या संघ कार्यालयातून वादग्रस्त वक्तव्याची स्क्रीप्ट येते व ते हे वक्तव्य करतात."

हेही वाचा: काँग्रेसकडून उद्या देशभरात 'किसान विजय दिवस', कार्यक्रमांचं आयोजन

"संघाच्या कार्यालयावर तिरंगा लावला जात नाही. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले तरी आपण काय बोलतो याचे भान ठेवावे. संघ, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक यांच्याशी माझे वैचारिक मतभेद आहे. मात्र त्यांचा अपमान होईल असे वक्तव्य कधीच केले नाही. वैचारिक मतभेद असणे मान्य पण, त्यांच्या बलिदान आणि योगदानावर टीका करणे अत्यंत चुकीचं आहे.’’

स्वातंत्र्य लढ्यात या कलाकारांचे कोणत्याही प्रकारचे योगदान नसताना त्यांना देशाच्या स्वातंत्र्याबद्दल आक्षेपार्ह विधान करण्याचा अधिकार कोणी दिला ? मी आंबेडकरवादी असून गांधी मार्गाने या कलाकारांच्या विरोधात सत्याग्रही आंदोलन करणार असल्याचे यावेळी माने यांनी सांगितले.

loading image
go to top