बंधाऱ्याच्या गळतीमुळं शेतीचं लई नुकसान होतंया! पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भावना

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

शेतासाठी पाणी मिळावं म्हणून सरकारानं कोल्हापरी पद्धतीचं बंधारं बांधलं. पण आमच्या भागात पाऊस जरा जास्तीच पडतो. त्यामुळं बंधारं खराब झाल्यात आणि त्यातून पाणी गळती होतीय. यामुळं धरण आणि बंधारं असूनही शेतीला वेळंत पाणी मिळत नाय. आमचा कोंढवळे येथील बंधारा तर चार वर्षांपूर्वीच वाहून गेलया.

पुणे - शेतासाठी पाणी मिळावं म्हणून सरकारानं कोल्हापरी पद्धतीचं बंधारं बांधलं. पण आमच्या भागात पाऊस जरा जास्तीच पडतो. त्यामुळं बंधारं खराब झाल्यात आणि त्यातून पाणी गळती होतीय. यामुळं धरण आणि बंधारं असूनही शेतीला वेळंत पाणी मिळत नाय. आमचा कोंढवळे येथील बंधारा तर चार वर्षांपूर्वीच वाहून गेलया. यामुळं शेतीचं लई नुकसान होतंया, असे वेल्हे तालुक्यातील मार्गासनी येथील शेतकरी नातू वालगुडे सांगत होते. अशीच स्थिती दापोडे येथील बंधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांची असल्याचे येथील शेतकरी रोहिदास शेंडकर यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मात्र आता या शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे. भोर व वेल्हे या दोन तालुक्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचा प्रश्र्न मार्गी लावावा. यासाठी विशेष दुरुस्तीअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे आणि बांधकाम सभापती प्रमोद काकडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. या मागणीनुसार पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निधी उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला आहे. यामुळे लवकरच या दोन्ही तालुक्यातील बारा बंधाऱ्यांची दुरुस्ती होणार आहे.

पुणे जिल्ह्यात  4571 नवे कोरोना रुग्ण 

उपमुख्यमंत्री पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला शिवतरे, काकडे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ.  राजेश देशमुख, जिल्हाधिकारी,पुणे,  जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक विलास राजपूत, अधिक्षक अभियंता संजीव चोपडे आदी उपस्थित होते.

या बैठकीत शिवतरे यांनी गुंजवणी, कानंदी व निरा नदीवरील प्रत्येकी ४ असे एकूण १२ कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांच्या विशेष दुरुस्तीसाठी गेल्या वर्षापासून प्रयत्न करण्यात येत असल्याचे पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. यासाठी तत्कालीन जलसंपदा रामराजे निंबाळकर यांच्याकडेही पाठपुरावा केला होता. त्यानुसार त्यांनी त्यावेळी अंदाजपत्रक तयार करण्याचा आदेश दिला होता. पण अद्याप त्याला मंजुरी मिळाली नसल्याचे सांगितले. 

आता रोज प्या शहाळे पाणी!; "सेव्हन मंत्राज'च्या माध्यमातून घरपोच वितरण 

गुंजवणी, कानंदी व निरा या तीन नद्यांवर हे बंधारे आहेत. यासाठी सुमारे साडे नऊ कोटी रुपये खर्च येणार आहे.  या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी देण्याचा आदेश पवार यांनी जलसंपदा विभागाला दिला आहे. त्यानुसार जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक चोपडे यांनी या प्रस्तावाला तत्वत: मंजुरी दिली असल्याचे शिवतरे यांनी सांगितले. 

पुण्यातील "जम्बो'च्या दिमतीला खासगी डॉक्‍टरांची फौज 

यामुळे भोर तालुक्यातील निरा नदीशेजारील २५ गावांमधील  ८१० हेक्टर, गुंजवणी नदीशेजारील १५ गावांचे १ हजार नऊ हेक्टर आणि  वेल्हे तालुक्यातील  कानंदी व गुंजवणी नदीशेजारील २६ गावांमधील  १ हजार २७३ हेक्टर क्षेत्राचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे.  यामुळे एकूण ३ हजार ९२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

बंधारानिहाय मंजूर निधी 
- कोंढवळे ( ता .वेल्हे) ---- ३८ लाख ९३ हजार रुपये.
-  खरीव (ता. वेल्हे) ---- ८९ लाख ९० हजार.
- दापोडे (वेल्हे)  ---- ३६ लाख ९१ हजार. 
- कोंढीवळे ---- ६२ लाख ७२ हजार.
- मार्गासनी  ----  ४९ लाख १० हजार.
- जांभळी (ता.भोर) ---- ५४ लाख ८२ हजार.
- दिडघर (ता.भोर)  ---- ७८ लाख ११ हजार.
- मोहरी (ता. भोर) ----     ८० लाख ८ हजार.
- नांदगाव (ता.भोर)  ---- ७८ लाख ३५ हजार.
- आंबेघर ---- ९० लाख ९१ हजार.
- वेनवडी (ता. भोर) ---- ६१ लाख ७९ हजार.
- भोर आरलॅब्ज ( ता. भोर) ---- ६९ लाख ४३ हजार.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leakage of the dam caused damage to agriculture