पक्ष सोडा...पुन्हा प्रवेश करा अन्‌ मोठे पद मिळवा! 

मंगेश कोळपकर - सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 31 जानेवारी 2017

पुणे - महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षात इतर पक्षांतून होत असलेल्या "इनकमिंग'वर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच चुलत भावाने सोमवारी निशाणा साधून पक्षाला घरचा आहेर दिला. "पक्षात मोठे व्हायचे असेल तर पक्ष सोडा, बंडखोरी करा आणि पुन्हा पक्षप्रवेश करून मोठे पद मिळवा,' असे सांगत सर्वपक्षीय उदाहरणांचा साक्षात्कारच त्यांनी "नेटिझन्स'ला घडविला. 

भाजपमधील "इनकमिंग'बद्दल निष्ठावंतांमध्ये नाराजीची भावना आहे. निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवारांना संधी देण्याचे धोरण पक्षाकडून होत असल्यामुळे अस्वस्थता आहे. या पार्श्‍वभूमीवर पुण्यात राहणारे मुख्यमंत्र्यांचे चुलत भाऊ प्रसनजित फडणवीस यांनी "तुम्हाला पक्षात मोठे व्हायचे असेल, तर पक्ष सोडा (कधी-कधी बंडखोरी करा), दुसऱ्या पक्षात गेल्यावर पहिल्या पक्षाला झोडपा, परत पहिल्या पक्षात प्रवेश करा आणि मोठे पद मिळवा' असे सोशल मीडियावर म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी विनायक निम्हण (शिवसेना, मग कॉंग्रेस, पुन्हा शिवसेना आणि आता शहर प्रमुख), योगेश गोगावले (भाजप, पुणे नागरी आघाडी, पुन्हा भाजप आणि आता शहराध्यक्ष), रमेश बागवे (कॉंग्रेस 1995, 1999 ला बंडखोरी आणि पुन्हा कॉंग्रेस आणि आता शहराध्यक्ष), वंदना चव्हाण (1999 मध्ये कॉंग्रेसकडून विधानसभा लढविली आणि आता राष्ट्रवादीमध्ये शहराध्यक्ष) आदी उदाहरणे दिली आहेत तर, मनसेमध्ये सगळेच शिवसेनेकडून आयात झाले आहेत, असे म्हटले आहे. 
प्रसनजित यांनी व्यक्त केलेल्या राजकीय निरीक्षणावर "नेटिझन्स'ने प्रतिक्रिया देताना आणखी काही उदाहरणे दिली आहेत. त्यात उज्ज्वल केसकर यांनी बंडखोरी केल्यावर स्वगृही परतल्यानंतर त्यांना पश्‍चिम महाराष्ट्राचे प्रवक्तेपद तर, एकेकाळी पक्षातून बाहेर पडलेल्या उदय जोशी यांची घरवापसी झाल्यावर त्यांना आता कार्यालयमंत्री केल्याचेही त्यात म्हटले आहे. दरम्यान, फडणवीस यांची पोस्ट आणि त्यावरील प्रतिक्रियांची माहिती भाजपच्या कार्यकर्त्यांत सायंकाळी वेगाने पसरली आणि त्याबाबत उलट-सुलट चर्चेचे मोहोळ उठले होते. 
--------------------- 

Web Title: Leave the party ... and get access to larger post