समाजाने आपला आवाज हरवला - लीलाधर मंडलोई

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

एक सुजाण नागरिक या नात्याने आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जपणूक करायला हवी. काळे ढग दाटून येणार असतील, तर आपण सावधान राहायला हवे. 
- लीलाधर मंडलोई, संचालक, ज्ञानपीठ 

पुणे - ""शेतकऱ्यांचे दु:ख आपल्याला दिसत नाही. धर्माच्या आड लपून तीन वेळा तलाक म्हणत महिलांवर अन्याय केला जातो, हे कळत नाही. एकाच वेळी अनेक दलितांची हत्या होते. महिलांवर अत्याचार होतात. आदिवासींना हाकलून लावले जाते. झाडांची कत्तल केली जाते. हेही आपल्याला समजत नाही. याचा अर्थ समाजाने आपला आवाज हरवला आहे आणि रागही,'' असे मत साहित्यातील सर्वोच्च सन्मान समजल्या जाणाऱ्या "ज्ञानपीठ'चे संचालक लीलाधर मंडलोई यांनी व्यक्त केले. समाजातील ही वास्तवता साहित्यात कुठे उतरत आहे, असेही ते म्हणाले. 

ठाकूर साहेब इन्दर सिंह शेखावत यांच्या स्मृतीनिमित्त सोनइन्दर प्रतिष्ठानतर्फे आयोजित सोहळ्यात मंडलोई यांना साहित्यिक दामोदर खडसे आणि शरणकुमार लिंबाळे यांच्या हस्ते "सोनइन्दर सन्मान' प्रदान करण्यात आला. तसेच लोकनाथ यशवंत (नागपूर), हृदयेश मयंक (मुंबई), देवदास बिस्मिल (पुणे), गजानन चव्हाण (पुणे), साज समूह (पुणे) यांनाही गौरविण्यात आले. विष्णू मनोहर, टिकम शेखावत उपस्थित होते. 

मंडलोई म्हणाले, ""राजकारणाचा, मतांचा विचार करून आपल्यासमोर एक चित्र रंगवले जाते. त्यालाच आपण सत्य समजतो आणि त्यातच गुरफटून जातो. त्यापलीकडे पाहायची आपली तयारी नसते. त्यामुळे खरे सत्य आपल्याला दिसत नाही किंवा राजकारण्यांच्या आणि दबंगगिरी करणाऱ्यांच्या भीतीपोटी आपण ते पाहत नाही. उलट अशा व्यक्तींना आपण सलाम करत राहतो किंवा लांबून दंडवत घालत राहतो. हे चित्र बदलले पाहिजे. परिस्थिती नीट समजून घेतली पाहिजे. कवी म्हणून मला ही बाब सतत आतून टोचत राहते.'' 

Web Title: Leeladhar Mandloi Expressed Society lost its voice