
Pune : अवसरी बुद्रुक परिसरात बिबट्याचे कुत्र्यावरील हल्ल्यात वाढ
पारगाव : अवसरी बुद्रुक ता.आंबेगाव येथे मागील काही आठवड्यांपासून बिबट्याचे पाळीव प्राण्यांवर वारंवार हल्ले होत आहेत मात्र वनखाते दुर्लक्ष करत असून आज गुरुवारी पहाटे अडीचच्या सुमारास भोकरशेत वस्तीवरील चेतन हिंगे यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे. ही घटना सीसीटिव्ही मध्ये कैद झाली आहे. वनविभागाने या परिसरात तातडीने पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
येथील भोकरशेत वस्तीवर आज पहाटे अडीचच्या सुमारास चेतन हिंगे यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला कुत्र्याच्या आवाजाने हिंगे जागे झाले म्हणून कुत्रा बचावला सदर घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. दोन दिवसापूर्वी तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष सर्जेराव हिंगे पाटील यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला होता त्याच्या आवाजामुळे सर्जेराव हिंगे जागे झाले व त्यांनी बिबट्याला पळवून लावले अशा प्रकारच्या अनेक घटना मागील काही दिवसांपासून होत आहेत मात्र वनखाते ग्रामस्थांपर्यंत पोहोचतच नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
मागील काही महिन्यापासून या परिसरात वन खात्याचे कर्मचारी फिरकत नाहीत त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्याच्या तक्रारी कोणाकडे करायचा असा प्रश्न नागरिकांना निर्माण झाला आहे.
पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचारी वसाहतीजवळ आज गुरुवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास सुरक्षा कर्मचारी सागर हिंगे,आविनाश गावडे, अविनाश धायबर व विलास बढे हे गस्तीवर असताना त्यांना बिबट्याच्या डरकाळीचा आवाज आला त्यांनी बॅटरीच्या उजेडात पाहिल्यावर बिबट्या झाडीत लपलेला दिसला सागर हिंगे यांनी बिबट्याचे मोबाईल चित्रीकरण केले या सर्वांनी दगडी फेकून बिबट्याला पळवून लावले