मांढर परिसरात बिबट्या दहशत: शेतकऱ्यावर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 February 2021

मांढर नजीक शिंदेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात विश्वास शंकर पापळ (वय ६०) हे जखमी झाले होते ससून हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर विश्वास पापळ यांना घरी सोडण्यात आले असून आमदार संजय जगताप यांनी विश्वास पापळ यांची घरी जाऊन भेट घेतली व विचारपूस केली.

परिंचे : मांढर (ता. पुरंदर) परिसरात धुमाकूळ घातलेल्या बिबट्याला पिंजरा लाऊन पकडण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार संजय जगताप व वन विभाग यांच्याकडे केली आहे. पांगारे, हरगुडे, मांढर परिसरात या बिबट्याची मोठी दहशत पसरली असल्याने शेतकऱ्यांना गुरे चरायला जायची भिती वाटत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

मांढर नजीक शिंदेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात विश्वास शंकर पापळ (वय ६०) हे जखमी झाले होते ससून हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर विश्वास पापळ यांना घरी सोडण्यात आले असून आमदार संजय जगताप यांनी विश्वास पापळ यांची घरी जाऊन भेट घेतली व विचारपूस केली. घटनास्थळी शेतकऱ्याबरोबर असलेल्या कुत्र्यांच्यामुळे शेतकऱ्यांचे प्राण वाचले असल्याचे सांगितल्यानंतर संजय जगताप यांनी जखमी अवस्थेत असलेल्या कुत्र्यांची पाहाणी केली. यावेळी तानाजी शिर्के,एम.के.पापळ, भालचंद्र निगडे, किसन शिंदे, उध्दव शिर्के,भरत शिंदे, सुभाष भारती आदी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

आणखी वाचा - पुण्यातली कॉलेज पुन्हा बंद होणार?

काल गुरुवारी (दि.१८) रोजी वन विभागाच्या वतीने या घटनेचा पंचनामा करण्यात आला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.पंचनामा करताना बिबट्याच्या पायाचे ठसे आढळले असून डोंगर भागात पाणी उपलब्ध नसल्याने हा बिबट्या पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावर आला असावा याच काळात विश्वास पापळ हे गुरे पाणी पाजण्यासाठी ओढ्यावर आले असावेत असा अंदाज वनपाल महादेव सस्ते यांनी व्यक्त केला आहे. गेल्या दोन महिन्यांत दहा ठिकाणी बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ला करून मारले असल्याच्या घटना घडल्या असून सर्व घटनांचे पंचनामे करण्यात आले असल्याचे वनपाल सस्ते यांनी सांगितले.

आणखी वाचा - पुण्यातली कॉलेज पुन्हा बंद होणार?

वन परिक्षेत्र अधिकारी जयश्री जगताप यांच्याशी संपर्क साधला असता बिबट्याने माणसावर हल्ला करण्याची या परिसरातील पहिलीच घटना आहे.संपुर्ण परिसरात बिबट्याने हल्ला करण्याच्या घटनांचा अहवाल वनपाल यांच्याकडून मागविण्यात आला असून तो अहवाल उपविभागीय वनाधिकारी कार्यालय (ता.भोर) सादर करण्यात येणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुचना दिल्यास पिंजरा लावण्याची प्रक्रीया केली जाणार आहे.

फोटो ओळ- मांढर (ता.पुरंदर) येथे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याची विचारपूस करताना आमदार संजय जगताप व शेतकरी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard Attack on farmers in Mandhar area