भरदिवसा बिबट्याचा ज्येष्ठावर हल्ला 

विवेक शिंदे
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

महाळुंगे पडवळ : चास (ता. आंबेगाव) येथील शेंगरमळा येथे रस्त्याने शेताकडे जात असलेल्या बाळासाहेब गणपत भोर (वय 60) यांच्यावर बिबट्याने हल्ला केला असून, या हल्ल्यात भोर जखमी झाले आहेत. घोर यांनी आरडाओरडा करून प्रतिकार केल्याने त्यांचे प्राण वाचले. परंतु या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

चास - चिखलदरा रस्त्याने पायी बाळासाहेब भोर शेंगरमळा येथील शेताकडे जात असताना सोमवारी दुपारी 4 वाजता अचानक उसाच्या शेतातून बिबट्या बाहेर येऊन भोर यांच्यावर हल्ला केला. प्रसंगावधान राखून आरडा ओरड केल्याने जवळच राहणारे पप्पू बारवे, गणेश काळोखे, शिवाजी बारवे, प्रीतम शेगर आदी नागरिक मदतीसाठी धावून आले. भोर यांच्या डोक्‍याला, उजव्या पायाला व छातीवर जखमा झाल्या आहेत.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देण्यात आली, परंतु संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कोणीही फिरकले नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. 
गेल्या काही वर्षांपासून चास परिसरात बिबट्याचा वावर आहे. यापूर्वी चास पंचक्रोशीत दोन वेळा बिबट्याने हल्ले केले आहे.

सोमवारी झालेला हा तिसरा हल्ला आहे. वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी चास ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्रीकांत चासकर यांनी केली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard attack on senior citizen