केडगावात बिबट्याच्या दोन पिलांचा वावर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

केडगाव - केडगाव (ता. दौंड) येथील शेळकेवस्तीत बिबट्यांच्या दोन पिलांचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावून आठ दिवस झाले आहेत. परंतु त्यात बिबट्या अडकला नसल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत. 

केडगाव - केडगाव (ता. दौंड) येथील शेळकेवस्तीत बिबट्यांच्या दोन पिलांचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावून आठ दिवस झाले आहेत. परंतु त्यात बिबट्या अडकला नसल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत. 

केडगाव परिसरातील देशमुख मळा येथे बिबट्याने काही शेळ्यांना ठार मारले होते. केडगाव ग्रामपंचायतीने मागणी केल्याने वनविभागाने तेथे पिंजरा लावला. गेल्या तीन दिवसांपासून ग्रामस्थांना बिबट्याची दोन पिले दिसली आहेत. या भागातील कुत्री नाहीशी होऊ लागली आहेत. रात्रीच्या वेळी ग्रामस्थ घराबाहेर पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आज दुपारी बिबट्याच्या पिलाने कोंबडी पळविल्याची घटना दत्ता शेळके यांनी पाहिली आहे. विजेचे भारनियमन दिवसा असल्याने रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देण्यासाठी शेतकरी घाबरत आहेत. रात्रीच्या वेळी तीन ते चार जणांचा गट करून शेतात पाणी धरावे लागत आहे. केडगाव परिसरातील दिवसाचे भारनियमन रद्द करावे, अशी मागणी शिवाजी शेळके यांनी केली आहे. पंधरा दिवसांपूर्वी पारगाव-शिंदेवाडी परिसरात बिबट्या पाहिल्याचे धनंजय काळे यांनी सांगितले.

पारगावात दोन वासरांचा बिबट्याकडून फडशा
पारगाव - पारगाव (ता. आंबेगाव) येथील ढोबळेमळ्यात निवृत्ती आनाजी ढोबळे यांच्या गोठ्याच्या बाहेर बांधलेल्या दोन वासरांवर बिबट्याने हल्ला करून त्यांना उसाच्या शेतात ओढून नेऊन त्यांचा फडशा पाडला आहे.
येथील शेतकरी निवृत्ती ढोबळे यांचा मुलगा शशिकांत ढोबळे हे आज रविवारी पहाटे मळ्यामधील लग्नाची वरात संपल्यावर घरी आले व गायीचे दूध काढण्यासाठी गोठ्यात गेले होते. त्या वेळी त्यांनी दीड वर्ष वयाची दोन वासरे गोठ्यातून बाहेर काढून गोठ्यासमोरील शेतात बांधली होती. ते थोड्या वेळाने गोठ्यातून बाहेर आले असता, दोन्हीही वासरे गायब झाली होती. शोधाशोध केली असता उसाच्या शेतात एक वासरू व शेताच्या बांधावर दुसरे वासरू मृत अवस्थेत आढळले.

...अन्‌ कालवडीला सोडून बिबट्या पसार
निरगुडसर - अवघ्या दहा फुटांवर बिबट्याने कालवडीला पकडलेले... मनात जिवाची भीती आणि कालवडीला वाचविण्याची अगतिकता... यामुळे क्षणाचाही विलंब न करता शेतकरी गणपत काशिबा पारधी यांनी काठी वाजवून आरडाओरडा केल्याने बिबट्याने कालवडीला सोडून पळ काढला. ही घटना निरगुडसर (ता. आंबेगाव) हद्दीतील वळसे मळ्यात रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली.

निरगुडसर येथील वळसे मळ्यात गण्याडोंगराजवळ गणपत काशिबा पारधी हे कुटुंब वास्तव्यास आहे. येथील शरद भोसले यांची शेती ते बटईने करतात. त्यांनी शनिवारी (ता.१६) येथील मळ्यातून कालवड विकत आणली होती. त्या कालवडीसाठी बंदिस्त घर नसल्याने वाघर लावून त्यात कालवड बांधली होती. परंतु, पहाटे साडेपाचच्या सुमारास कालवडीचा ओरडण्याचा आवाज ऐकून गणपत पारधी बाहेर आले. तेव्हा अवघ्या १० फुटांवर असलेल्या बिबट्याच्या तोंडात कालवडीचे तोंड होते. ते पाहून त्यांची बोबडीच वळली; परंतु धाडस दाखवत हातात काठी घेऊन जोरात आरडाओरड केल्याने बिबट्याने कालवडीला सोडून धूम ठोकली. कालवडीच्या तोंडाला बिबट्याचा दात लागून जखम झाली आहे. वन विभागाने तातडीने या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी शरद भोसले, पी. आर. हिंगे, आनंदराव हिंगे यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard Calf Kedgav