घोडेगावात बिबट्या जेरबंद (व्हिडिओ)

चंद्रकांत घोडेकर
मंगळवार, 10 जुलै 2018

घोडेगाव (पुणे): घोडेगाव (ता. आंबेगाव) जवळील पसारेवस्तीत सोमवारी (ता. 9) रात्री बिबट्या जेरबंद झाला. यापरिसरातील गोनवडी, कोलदरा, आमोंडी, इनामवस्ती, धोंडमाळ या गावातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. बिबट्याच्या भीतीमुळे शेतीच्या कामांवर मोठा परिणाम झाला होता.

घोडेगावपासून एक किलोमीटर अंतरावर डॉ. अतुल चिखले यांच्या शेताच्या जवळ वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात रात्री बिबट्या जेरबंद झाला. 8 जुलै रोजी हा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसला होता ही माहिती वनक्षेत्रपाल वाय. एस. महाजन यांना दिली. त्यांनी तातडीने काल पिंजरा लावला. पिंजऱ्यात दोन शेळ्या ठेवल्या होत्या. पिंजऱ्यात रात्री हा बिबट्या जेरबंद झाला. आज (ता. 10) सकाळी डॉ. अतुल चिखले यांनी बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती वनविभागाला दिली. श्री. महाजन यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना याबाबत सुचना केली. हा बिबट्या पाहण्यासाठी गर्दी झाली. बिबट्याला माणिकडोह निवारा केंद्रात हलविण्यात आले. अंदाजे दीड वर्षाचा हा बिबट्या असल्याचे महाजन यांनी सांगितले. वनविभागाने 12 तासात पिंजरा लावून तो जेरबंदही केला. याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

हा बिबट्या जरी जेरबंद झाला असला तरी नारोडी जवळील परांडा, रोहिमाळ येथे बिबट्याची मादी व दोन बछडे अनेकांनी पाहिले आहेत. त्यांची वस्तीही उसाच्या शेतात आहे. तसेच कडेवाडी, चिंचोली येथेही बिबट्याचे दर्शन झाले आहे. मोठी दुर्घटना होण्याअगोदर येथे पिंजरा लावावा अशी मागणी होत आहे.

Web Title: leopard capture at ghodegaon