जांबूतमधील नरभक्षक बिबट्या जेरबंद

युनूस तांबोळी
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

जांबूत (ता. शिरूर) जोरीलवन येथील नरभक्षक बनलेला बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद झाला. या परिसरात अजून बिबटे व पिल्ले फिरत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

टाकळी हाजी (पुणे) : जांबूत (ता. शिरूर) जोरीलवन येथील नरभक्षक बनलेला बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद झाला. या परिसरात अजून बिबटे व पिल्ले फिरत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

समृद्धी योगेश जोरी या दोन वर्षांच्या चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात जीव गेला होता. पाळीव प्राण्यावरही हल्ले केले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे वनविभागाबाबत नाराजीचा सूर होता. वनविभागाने या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी 10 पिंजरे व 22 कॅमेरे लावले होते. शिरूर, जुन्नर, आंबेगाव, खेड, चाकण येथील अधिकाऱ्यांनी रात्रीची गस्त सुरू केली होती. तरी देखील येथील पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद होत नव्हता. घराजवळ बिबट्या येत असल्याने प्रशांत जोरी यांनी घराभोवती तारेचे कुंपण व सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. अखेर वनविभागाच्या अथक परिश्रमाला यश आले.

जेरबंद झालेला बिबट्या सात वर्षे वयाची मादी असून पूर्ण वाढ झालेली आहे. अधिक वजनाचा बिबट असल्याने तातडीने माणिकडोह (ता. जुन्नर) येथे हलविण्यात आल्याची माहिती शिरुरचे वनअधिकारी मनोहर म्हसेकर यांनी दिली. या परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या आहे. एक मादी व तिची पिल्ले फिरताना रोज पाहायला मिळत आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard Cought In Shirur Tehesil