esakal | प्लास्टिक पिशवीत अडकून बिबट्याचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

Leopard
प्लास्टिक पिशवीत अडकून बिबट्याचा मृत्यू
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ओझर - धनगरवाडी (ता. जुन्नर) येथील रमेश दगडू शेळके यांच्या शेतातील विहिरीत पडून अंदाजे सहा वर्ष वयाच्या पूर्ण वाढ झालेल्या बिबट मादीचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. सकाळच्या वेळी वीज पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या शेळके यांना विहिरीतील पाण्यात प्लास्टिकच्या पिशवीत अडकलेला बिबट्याचा मृतदेह तरंगताना आढळला.

शेळके यांनी ही बाब त्वरित वन विभागाला कळवली. वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे, वनपरिमंडल अधिकारी मनिषा काळे तसेच वनरक्षक कल्याणी पोटवडे यांनी घटनास्थळी दाखल होऊन सरपंच महेश शेळके, श्रीपत नेहरकर तसेच ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याचा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढला.

विहिरी लगतच्या शेतात मेंढरांचा वाडा असल्याने रात्रीच्या वेळी भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या कठडे नसलेल्या विहिरीत पडला असावा. विहिरीत पूर्वीच पडलेल्या रिकाम्या प्लास्टिक पिशवीत बिबट्याचे तोंड अडकल्याने त्याचा गुदमरून मृत्यू झाला असल्याचा अंदाज वन विभागाकडून व्यक्त केला जात आहे. खामगाव येथील पशुचिकित्सक डुंबरे आणि निखिल बनगर यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले.