केशवनगरमध्ये  बिबट्याचा धुमाकूळ 

केशवनगरमध्ये  बिबट्याचा धुमाकूळ 

मुंढवा / पुणे - घराच्या मागील भागात पाणी गरम करीत असलेल्या एका ज्येष्ठ महिलेवर बिबट्याने हल्ला करण्याची घटना केशवनगरमधील भोई वस्तीमध्ये सोमवारी सकाळी सातच्या सुमारास घडली. प्रसंगावधान राखून महिलेने त्याच्याशी यशस्वी सामना केला. त्यानंतर सुमारे तीन तास बिबट्याने सुमारे ७०० मीटर परिसरात धुमाकूळ घातला. वनविभाग आणि रहिवाशांच्या प्रयत्नांनतर इंजेक्‍शन देऊन बिबट्याला पकडण्यात आले. 

या घटनेत ज्येष्ठ महिलेसह तिघे जण जखमी झाले आहेत. बिबट्याला सकाळी दहाच्या सुमारास कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात दाखल करण्यात आले. मुळा-मुठा नदीच्या काठावरून बिबट्या केशवनगरमध्ये पोचला असावा, असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. बिबट्याने धुमाकूळ घातल्याचे वृत्त कानोकानी पोचल्यावर केशवनगर, मुंढवा परिसरात खळबळ उडाली होती.   दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून वनविभागाकडून परिसरात तपासणी सुरू करण्यात आली आहे.   

 भोईवस्तीमध्ये घराच्या मागील भागातील चुलीवर पाणी गरम करण्यासाठी गेलेल्या समिंद्रा तारू (वय ७० वर्षे) यांच्यावर बिबट्याने हल्ला चढविला. त्याने मारलेला पहिला पंजा त्यांच्या डोक्‍याला लागला, तर दुसरा मानेवर लागला. तरीही मोठ्या धैर्याने त्यांनी हातातील प्लॅस्टिकची बादली बिबट्याच्या चेहऱ्यावर पालथी केली. त्यामुळे त्याची मान बादलीत अडकली. तेवढ्यात समिंद्रा यांनी आपली सुटका करून घेतली. त्यानंतर त्याने मागे सरकत मानेला हिसका दिला. त्यामुळे बादली पडली व त्याने धूम ठोकली. 

भोई वस्तीतून बिबट्या रेणुका माता मंदिराच्या भिंतीवरून ‘लेबर कॅंप’कडे धावला, तेथे सुखराम या मजुराच्या मांडीला धरले. आरडाओरडा झाल्यावर तो एका लहान मुलीकडे वळाला. त्या वेळी त्या मुलीला वाचविण्यासाठी विकास भोकरे यांनी बिबट्याबरोबर झटापट केली. त्यात ते जखमी झाले. तेथून बिबट्या ‘व्हर्टीकल इन्फ्रा’ या बांधकाम सुरू असलेल्या पंधरा मजली इमारतीत घुसला. दरम्यान, नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिस उपनिरिक्षक कुंडलिक वाळके यांनी वनविभागाशी संपर्क साधला. त्याच वेळी अग्निशामक दलाची सेंट्रल फायर ब्रिगेडची गाडी आली. त्यांनी इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर जाळी लावली. राजीव गांधी उद्यानाची आणि वन विभागाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संपूर्ण इमारतीत शोध घेतला; मात्र बिबट्या दिसला नाही. अखेर ‘डक्‍ट’ जवळ टाकलेल्या पुठ्ट्यांमध्ये तो बसलेला दिसला. ही संधी साधून वनविभाग कर्मचाऱ्यांसह स्थानिक कार्यकर्ते दत्तात्रय कोद्रे, दिलीप व्यवहारे, बाबा कोरे यांनी त्याच्यावर जाळी टाकली व त्याला पकडले. जाळीतून सुटका करून घेण्यासाठी बिबट्याने जाळीतूनच वनविभागाचे नियतक्षेत्र अधिकारी बी. एस. वायकर यांच्या हाताला पंजा मारला. त्यात ते जखमी झाले. अविनाश अभंगे या तरुणाच्या छातीवरही त्याने पंजा मारला. सुटण्यासाठी बिबट्याची धडपड सुरू असताना, रमेश कदम व वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी त्याला दाबून धरले. त्याच वेळी बिबट्याला इंजेक्‍शन दिल्यावर तो बेशुद्ध झाला. तातडीने त्याची रवानगी कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात करण्यात आली. 

बिबट्याचा माग निघेना ! 
वाघोली, आव्हाळवाडी, मांजरी परिसरात उसाची शेती आहे. तेथून नदीकाठावरून बिबट्या केशवनगरमध्ये आला असावा. या पूर्वी येथे बिबट्याचा वावर असल्याचे ऐकलेले नाही. हा कोठून आला असावा, याबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाणी गरम करण्यासाठी निघाले तेव्हा कुत्रेच बसले आहे, असे वाटले. मी खाली वाकले असता िबबट्याने डोक्‍यावर पंजा मारला. मी स्वतःला वाचविण्यासाठी हातातली बादली त्याच्या तोंडावर घातली. त्यामुळेच तो पळून गेला.  
- समिंद्रा तारू, भोईवस्ती, केशवनगर 

बिबट्याला पकडण्यासाठी त्याच्यावर जाळी फेकली. परंतु, त्याने हातावर पंजा मारला. हा बिबट्या सुमारे पाच वर्षे वयाचा असावा. अन्नाच्या शोधार्थ तो येथवर आला असावा. 
- बी. एस. वायकर, नियतक्षेत्र अधिकारी, वनविभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com