
Pune : वर्षभरात बिबट्याने मारले चार घोडे
निरगुडसर : येथे गेली दोन दिवस बिबट्याने धनगर वाड्यावर हल्ला करत एक महिन्याचे कोकरू व चार वर्षाचा घोडा जाग्यावर ठार मारल्याची घटना नागपूर (ता. आंबेगाव) येथील मिंडे वस्तीत मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.
ज्ञानदेव दामू माने या धनगर मेंढपाळाचा गेल्या वर्षभरात हा चौथा घोडा बिबट्याने ठार केला आहे.
नागापूर ते मंचर रस्त्यावर मिंडेवस्ती नजीक ज्ञानदेव दामू माने (मुळ राहणार शिंदोडी, साकूर मांडवे ता. संगमनेर) येथील धनगर मेंढपाळाचा वाडा गेली २० वर्षांपासून वास्तव्यास आहे. शनिवारी (ता. ३) बिबट्याने वाड्यामधील एका कोकराला उचलून नेऊन त्याचा फडशा पाडला. त्यानंतर रविवारी (ता. ४ ) रोजी मध्यरात्री वाजण्याच्या सुमारास बिबट्याने पुन्हा वाड्यावर हल्ला करून त्यातील एका घोड्याला जागीच ठार मारले.
यावेळी माने परिवार जागा झाल्याने पुढील बकरावर हल्ला होण्यापासून बचाव झाला माने यांनी काठी भिरकवल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात चौथा घोडा बिबट्याने ठार मारला आहे. वनविभागाकडून आता पर्यंत केवळ एका घोड्याची नुकसान भरपाई मिळाली आहे. या घटनेची माहिती समजल्यानंतर वनविभागाच्या अधिकारी वर्गाने घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे.
मेंढपाळ ज्ञानदेव माने यांनी रात्री वाड्याभोवती विजेची सोय केली आहे. तरी देखील सलग दोन रात्री बिबट्याने हल्ला करून घोडीला ठार मारले. या प्रकारामुळे धनगर मेंढपाळांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून आर्थिक फटका बसत आहे त्यामुळे वनविभागाने तातडीने या परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
नुकसान भरपाईची मागणी
गेल्या वर्षभरात चार घोडे बिबट्याने ठार मारले आहेत. त्यामध्ये एकच घोड्याची मदत शासनाकडून मिळाली आहे. अजून दोन घोड्याची मदत मिळाली नाही त्यातच चौथा घोडा ठार मारला हा घोडा आठ दिवसांपूर्वीच २५ हजार रुपयांना विकत आणला होता आणि लगेच बिबट्यानेही त्याला मारला. १०० टक्के भरपाई मिळत नसल्यामुळे जगायचे तरी कसे हा प्रश्न उद्भवला आहे.