कोरेगावात बिबट्याच्या वावराने घबराट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

फटाके काय हातात घेऊन फिरायचे का?
बिबट्या दिसल्यावर फटाके वाजवा, असे वन कर्मचारी नागरिकांना सांगतात. मात्र, अचानक बिबट्यासमोर आल्यावर गर्भगळीत होण्याचीच वेळ आल्यावर फटाके कधी वाजवायचे? अन्‌ फटाके काय सतत हातात घेऊन फिरायचे का? असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत.

कोरेगाव भीमा - कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे दिवसाढवळ्या बिबट्याकडून तरुणाच्या पाठलागामुळे शेतकरी वर्गात अगोदरच दहशत असताना, काल दुपारी कोरेगावातील इंग्रजी शाळेजवळ बिबट्या बछड्यासह फिरताना दिसला. त्यामुळे शिक्षक, पालक; तसेच विद्यार्थ्यांत घबराट पसरली आहे. बिबट्याच्या भीतीमुळे शेतात, मॉर्निंग वॉक; तसेच आता शाळेत जाणेही अवघड झाल्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

कोरेगाव भीमा, वढु बुद्रुक, आपटी व डिंग्रजवाडी परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून कुत्रे; तसेच पाळीवर प्राण्यांची शिकार करणाऱ्या बिबट्या व बछड्याचा वावर निदर्शनास येत आहे. डिंग्रजवाडी येथील एकनाथ हरगुडे यांच्या गोठ्यातील शेळीवर 26 जानेवारीला हल्ला करून बिबट्याने फडशा पाडला. त्यानंतर कोरेगाव भीमाच्या पोलिस पाटील मालन गव्हाणे यांच्या शेतात बसलेल्या धनगराच्या वाड्यावरील घोडी ठार करून तिच्यासह दोन कुत्र्यांचाही बिबट्याने फडशा पाडला. 31 जानेवारीला कोरेगावातच शेतात काम करीत असताना विश्‍वास गव्हाणे या तरुणाचा बिबट्याने पाठलाग केला होता. मात्र, प्रसंगावधान दाखवून विजेच्या खांबावर चढल्याने विश्‍वास बचावला. तेव्हापासून शेतकऱ्यांनाही जीव मुठीत धरूनच शेतात काम करावे लागत आहे.

फटाके काय हातात घेऊन फिरायचे का?
बिबट्या दिसल्यावर फटाके वाजवा, असे वन कर्मचारी नागरिकांना सांगतात. मात्र, अचानक बिबट्यासमोर आल्यावर गर्भगळीत होण्याचीच वेळ आल्यावर फटाके कधी वाजवायचे? अन्‌ फटाके काय सतत हातात घेऊन फिरायचे का? असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत.

Web Title: leopard in koregaon