
निरगुडसर : जुन्नर वनविभागात बिबट्याची डरकाळी वाढली असून आंबेगाव,जुन्नर,शिरूर,खेड तालुक्यात गेल्या ४० महिन्यात बिबट्याने १२ मनुष्यांसह १० हजार पशुधनाचा जीव घेतला आहे,तसेच ३३ मनुष्यावर हल्ले झाले आहेत तशी वनविभागाकडून भरपाई मिळाली असली तरी गेलेला जीव परत येत नाही त्यामुळे बिबट्याचे संकट सरकारने वेळीच रोखणे गरजेचे आहे.
उत्तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर वनविभागातील आंबेगाव, जुन्नर शिरूर, खेड तालुक्यात बिबट्यांची दहशत वाढली असून दिवसा-ढवळ्या बिबटे फिरू लागले आहेत, त्यामुळे जगायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. जुन्नर, शिरूर, आंबेगाव परिसरात ऊस शेती मोठ्या प्रमाणात असून हेच बिबट्याचे आश्रयस्थान बनले आहे, उसाबरोबर जवळच असलेले घोड, मीना नदीचे पात्र यामुळे बिबटे याठिकाणी वास्तव करून राहत आहे.