बिबटे पडताहेत महागात

बिबटे पडताहेत महागात

पुणे - वन्यप्राण्यांचे हल्ले वनखात्याला चांगलेच महागात पडत आहेत. तीन वर्षांपूर्वीपर्यंत या हल्ल्यातील नुकसानभरपाईचा आकडा लाखांमध्ये होता. मागच्या वर्षी तो कोटींत पोचला. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत वनखात्याला नुकसानभरपाईची दुप्पट रक्कम द्यावी लागल्याची माहिती पुढे आली आहे. बहुतांश हल्ले बिबट्यांनी जुन्नर, आंबेगाव तालुक्‍यांमध्ये केले आहेत. 

पुणे जिल्ह्यात वन्यप्राण्यांपासून झालेल्या मनुष्य, पशुधन आणि पीकहानीचा अहवाल वनखात्याने तयार केला आहे. त्यातून ही माहिती पुढे आली. गेल्या तीन वर्षांमध्ये चार कोटी १८ लाख ५ हजार ३६ रुपयांची नुकसानभरपाई दिली आहे. या नुकसानभरपाईची रक्कम प्रत्येक वर्षी वाढत असल्याचे अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे बिबट्या वनखात्याला महागात पडत आहेत. 

जुन्नर, आंबेगावमध्ये गेल्या काही वर्षांपासून ऊसक्षेत्रातील बिबट्यांची संख्या वेगाने वाढली आहे. बिबट्यांची या भागातील ही दुसरी-तिसरी पिढी आहे. या भागात माणसांवर बिबट्यांनी हल्ले केल्याच्या घटना दरवर्षी वाढत आहेत. त्याचबरोबर शेळ्या, बकऱ्यांवरील हल्ले आणि शेतीचे नुकसानही वेगाने वाढत असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

हल्ल्यात तीन वर्षांत सहा मृत्यू
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात तीन वर्षांमध्ये जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी एकाचा मृत्यू झाला होता. या वर्षी ही संख्या तीन झाली. हल्ल्यातील मृताच्या वारसाला तीन वर्षांमध्ये ६२ लाख रुपये वनखात्याने दिले आहेत. 

याच तीन वर्षांमध्ये २७ जण जखमी झाले आहेत. त्यांना सहा लाख ३० हजार ६२५ रुपयांची नुकसानभरपाई दिली आहे. 

तीन वर्षांमधील नुकसानभरपाई (सर्व आकडे रुपयांत)
  मनुष्यहानी (मृत्यू) ..... ६२ लाख
  जखमी ................... ६ लाख ३० हजार ६२५
  पशुधन .................. २ कोटी ९१ लाख ५७ हजार ८५०
  पीकहानी ................ ५८ लाख १६ हजार ५६१

वाढती नुकसानभरपाई (सर्व आकडे रुपयांत)
  २०१६-१७ ........ ८२ लाख ३७ हजार ९२४
  २०१७-१८ ........ १ कोटी १३ लाख ८८ हजार ४८९
  २०१८-१९ ....... २ कोटी २१ लाख ७८ हजार ६२३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com