बिबट्या अडकला पिंजऱ्यात अन् मोहिम झाली फत्ते

रवींद्र पाटे
Sunday, 10 January 2021

सुटकेसाठी  पिंजऱ्याला धडक्या दिल्यामुळे बिबट्याच्या डोक्यावर व पाठीवर जखमा झाल्या आहेत. उपचारासाठी आज सकाळी त्याला माणिकडोह निवारा केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

नारायणगाव : नारायणगाव, कोल्हेमळा परिसरात मागील सहा महिन्यांपासून वास्तव्यास असलेला व पंधरा दिवसांपासून वन विभागाला गुंगारा देणारा पूर्ण वाढ झालेला नर बिबट्या आज पहाटे पिंजऱ्यात अडकल्याने वन विभागाची बिबट्या जेरबंद मोहीम फत्ते झाली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सुटकेसाठी  पिंजऱ्याला धडक्या दिल्यामुळे बिबट्याच्या डोक्यावर व पाठीवर जखमा झाल्या आहेत. उपचारासाठी आज सकाळी त्याला माणिकडोह निवारा केंद्रात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती वनपाल मनीषा काळे यांनी दिली.

नारायणगाव शहरालगत असलेल्या येथील कोल्हे मळा, औटी मळा शिवारातील उसाच्या शेतात मागील सहा महिन्यांपासून बिबट्या वास्तव्यास होता. बिबट्याने या भागातील पाळीव कुत्रे, शेळ्या व वासरे यांचा फडशा पडला होता. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने या भागात पिंजरा लावला होता. तो पिंजऱ्या जवळ येत असे मात्र पिंजऱ्यात जात नसल्याने चिंता वाढली होती. दहा दिवसा पूर्वी मध्यरात्री बिबट्या नारायणगाव येथील साकार नगरीत आल्याचे सीसीटीव्ही फूटेज व्हायरल झाले होते. भक्ष्याच्या शोधात बिबट्या शहरी भागात येत असल्याने चिंता व्यक्त होत होती. या मुळे दहा दिवसापूर्वी ठिकाण बदलून पिंजरा साकार नगरीच्या मागील भागात रवींद्र कोल्हे यांच्या घराजवळील उसाच्या शेतात लावला होता. पिंजऱ्यात भक्ष म्हणून कोंबडी ठेवण्यात आली होती. दहा दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आज पहाटेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला.

आक्रमक बिबट्याने सुटका करून घेण्यासाठी पिंजऱ्याला धडका मारल्याने त्याचे डोके व पाठीवर जखमा झाल्या आहेत. आज सकाळी वनपाल काळे,वनकर्मचारी वारे, भुजबळ हे पिंजरा नेण्यासाठी आले. नुकत्याच झालेल्या पावसामुळे गाळ झाल्याने स्थानिक नागरिकांच्या मदतीने पिंजरा गळातून उचलून वनविभागाच्या गाडीत ठेवला. उपचारासाठी बिबट्याला माणिकडोह निवारा केंद्रात रवाना करण्यात आले.

'क्षमता नसेल, तर ऑफलाइन परीक्षा घ्या'; अधिसभा सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला घेतले फैलावर

भक्ष शोधण्यासाठी बिबट्याचा वावर दाट लोकवस्ती असलेल्या शहरी भागात वाढला आहे. या मुळे सायंकाळ नंतर लहान मुलांना एकटे सोडू नका. रात्री घरा बाहेर लाइट सुरू ठेवा. लहान मुलांची काळजी घ्या. -वनपाल मनीषा काळे (उपवनसंरक्षक विभाग जुन्नर)

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The leopard was found in a cage