कुष्ठरुग्णांसाठी योजनाच नाही - डॉ. आमटे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

पुणे - ‘‘देशातील कुष्ठरोग्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याची सद्यःस्थिती आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचा त्यात तिसरा क्रमांक आहे. ठाण्यात सर्वाधिक कुष्ठरोगी असल्याचे समजते. कुष्ठरोग्यांची संख्या वाढत आहे. मात्र, त्यांच्यावर उपचारासाठी प्रभावी योजनाच अद्यापही नाही,’’ अशी खंत व्यक्त करत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास आमटे यांनी व्यक्त केली. ‘‘आनंदवन’सारख्या संस्था बंद करणं, हे आमचं ध्येय असून त्यासाठी आम्ही झटत आहोत,’’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

शंकरराव भोई प्रतिष्ठानतर्फे डॉ. आमटे यांच्याशी अनौपचारिक गप्पांच्या कार्यक्रमाचे मंगळवारी आयोजन केले होते. या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई, अभिनेत्री जयमाला इनामदार, उद्योजक कृष्णकुमार गोयल, गायक इक्‍बाल दरबार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या वेळी डॉ. आमटे यांनी महारोगी सेवा समिती आणि आनंदवनच्या निर्मितीचा प्रवास उलगडला. जवळपास शंभराहून अधिक अंध, अपंग कलाकारांनी साकारलेल्या ‘स्वरानंदवन’ या कार्यक्रमाच्या निर्मिती आणि यशाचे गमकही त्यांनी सांगितले.

डॉ. आमटे म्हणाले, ‘‘बाबांनी काही दशकांपूर्वी कुष्ठरोग्यांसाठी काम सुरू केले. त्या वेळीही या रुग्णांना समाजात स्थान नव्हते. आपण आधुनिकतेकडे वाटचाल करत असतानाही आज या रुग्णांना समाजात स्वीकारले जात नाही, हे दुर्दैव आहे. या रुग्णांना समाजात स्वीकारले जावे आणि त्यांनाही सन्मान मिळावा, यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न होत नाहीत; परंतु समाजातील ही अनास्था दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे.’’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भोई यांनी केले. 

वस्तूंच्या विक्रीसाठी दुकान नाही
‘‘आपल्या देशातील एखाद्या व्यक्तीला कांस्यपदक मिळाले, की त्याला सदनिका दिली जाते. क्रिकेटच्या सामन्यात शतक केले की, आलिशान चारचाकी भेट दिली जाते; परंतु आनंदवन संस्था सात दशकांहून अधिक काळ महारोग्यांसाठी काम करत आहे. मात्र, संस्थेत निर्माण होणाऱ्या वस्तूंची विक्री करण्यासाठी एखादे दुकानही दिलेले नाही,’’ अशी खंत डॉ. विकास आमटे यांनी व्यक्त केली.

Web Title: leprosy patients not plan to