धरणांचा साठा काही वाढेना

रवींद्र पाटे
गुरुवार, 25 जुलै 2019

पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने झाले आहेत. मात्र, कुकडी प्रकल्पांतर्गत धरणात आजअखेर केवळ 7.11 टीएमसी (23.41 टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी आजअखेर प्रकल्पात 17.32 टीएमसी (56.72 टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत प्रकल्पात अत्यल्प पाणी साठा झाल्याने जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या सात तालुक्‍यांतील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

नारायणगाव : पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने झाले आहेत. मात्र, कुकडी प्रकल्पांतर्गत धरणात आजअखेर केवळ 7.11 टीएमसी (23.41 टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी आजअखेर प्रकल्पात 17.32 टीएमसी (56.72 टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत प्रकल्पात अत्यल्प पाणी साठा झाल्याने जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या सात तालुक्‍यांतील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

कुकडी प्रकल्पांतर्गत येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे, डिंभे या धरणांचा समावेश होतो. प्रकल्पाची उपयुक्त पाणीसाठवण क्षमता 30.54 टीएमसी आहे. मागील वर्षी प्रकल्पात 25 टीएमसी (85 टक्के) एकूण उपयुक्त पाणीसाठा झाला होता. प्रकल्पातील उपयुक्त पाणी साठ्यासह पिंपळगाव जोगे धरणातील सुमारे तीन टीएमसी मृतसाठा असा सुमारे 28 टीएमसी पाणीसाठा रब्बी व उन्हाळी हंगामात जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या सात तालुक्‍यांत सिंचन व बिगर सिंचनासाठी वापरण्यात आला. कुकडी डावा कालव्यातून नियोजनापेक्षा जास्त पाणी सोडण्यात आल्याने प्रकल्पांतर्गत वडज, पिंपळगाव जोगे, डिंभे या धरणांचा शून्य टक्के उपयुक्त पाणी साठा मेअखेर झाला होता. मेअखेर येडगाव, माणिकडोह धरणांत 0.269 टीएमसी (0.88 टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. या वर्षी जून महिना कोरडा गेला. याचा एकूणच परिणाम कुकडी प्रकल्पाच्या पाणी साठ्यावर झाला आहे. एक जुलैपासून धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झाला आहे. यामुळे प्रकल्पीय पाणी साठ्यात वाढ झाली आहे. डिंभे व माणिकडोह धरणांच्या उपयुक्त पाणी साठ्यात सुमारे साडेपाच टीएमसी वाढ झाली आहे. पिंपळगाव जोगे धरणाच्या मृत साठ्यात एक टीएमसी वाढ झाली आहे. वडज व येडगाव धारणाच्या पाणी साठ्यात अद्याप अपेक्षित वाढ झाली नाही. पुढील दोन महिन्यांत धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी वर्ग आहेत.

कुकडी प्रकल्पांतर्गत धरणातील आजअखेरचा उपयुक्त पाणीसाठा टीएमसी (कंसात एकूण पाऊस मिलिमीटरमध्ये) : येडगाव : 0.329 (352), माणिकडोह : 1.70 (425), वडज : 0.512 (277), डिंभे : 4.62 (638), पिंपळगाव जोगे धरणात 1.5 टीएमसी मृत साठा झाला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Less Water Stock in Dam