esakal | खबरदारी घेऊ...कोरोनावर मात करू!

बोलून बातमी शोधा

कोरोना

खबरदारी घेऊ...कोरोनावर मात करू!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरते आहे. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. हे संकट मोठे आहे. तथापि, काही साध्या-सुध्या गोष्टी नीट पाळल्या आणि आरोग्याच्या नियमांचे व्यवस्थित पालन केल्यास आपण या संकटाची तीव्रता कमी करू शकतो, असा विश्वास राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी व्यक्त केला.

आपण काय करू शकतो?

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोरोनाची अनाठायी भीती बाळगू नका. सर्वत्र याच आजाराचे नाव ऐकू येत असले तरी या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण एक टक्क्यापेक्षा कमी आहे, हे लक्षात ठेवूया. कोरोना झालेल्या रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाइकाला भेदभावाची वागणूक देऊ नका. परस्परांना मदत करा. कोरोना प्रसार टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्या. मास्क वापरणे, हातांची स्वच्छता, योग्य शारीरिक अंतर पाळणे, गरज नसताना बाहेर न पडणे, हे साधेसुधे नियम पाळणे आवश्यक आहे. तसेच आपण बाधित आल्यानंतर आपल्या संपर्कातील व्यक्तींची माहिती आरोग्य विभागाला दिल्याने त्या व्यक्तींचा शोध लवकर घेता येतो आणि प्रसाराला आळा घालता येतो.

हेही वाचा: लसीकरणात दुसऱ्या डोसचेच जास्त लाभार्थी; पुण्यात शनिवारी तुटवडा कायम असणार

जोखीम जास्त कोणाला?

ज्यांचे वय ५० पेक्षा अधिक आहे, ज्यांना मधुमेह-उच्च रक्तदाब असे आजार किंवा लिव्हर, किडनीचे आजार आहेत, ज्यांचे वजन जास्त आहे, अशा व्यक्तींमध्ये कोरोना आजाराची गुंतागुंत अधिक प्रमाणात होते. त्यामुळे अशा व्यक्तींनी खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.

त्रिस्तरीय उपचार सुविधा

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात तीन स्तरीय रचना उभी करण्यात आलेली आहे.

१) कोविड केअर सेंटर ः तालुका पातळीपासून ही केंद्रे कार्यरत आहेत. राज्यभरात अशी दोन हजारांहून अधिक केंद्रे आहेत. या केंद्रांमध्ये सौम्य स्वरूपाच्या रुग्णांवर उपचार केला जातो.

२) कोविड हेल्थ सेंटर ः या केंद्रांमध्ये मध्यम स्वरूपाच्या रुग्णांवर उपचार केला जातो. काही ऑक्सिजन बेड देखील या केंद्रांमध्ये उपलब्ध असतात. तालुका आणि जिल्हा पातळीवर ही केंद्रे कार्यरत आहेत. राज्यात अशी सोळाशेहून अधिक केंद्रे कार्यरत आहेत.

३) कोविड हॉस्पिटल ः गंभीर स्वरूपाच्या रुग्णांसाठी ही केंद्रे कार्यरत आहेत. इथे ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर आणि अतिदक्षता विभागाची सोय आहे. राज्यात सुमारे ९५० कोविड हॉस्पिटल्स कार्यरत आहेत.

हेही वाचा: राजकारणी मंडळीमुळे पुण्यातील जम्बो हॉस्पिटलमधील अधिकारी, डॉक्टर हैराण

कोणत्या रुग्णास भरती होणे आवश्यक?

✓ ज्याचे वय ५० पेक्षा अधिक आहे आणि ज्याला काही जोखमीचे आजार आहेत.

✓ ज्याचा आजार सौम्य स्वरूपाचा आहे; पण घरात पुरेशी जागा नाही.

✓ ज्यांचे ऑक्सिजनचे प्रमाण ९३ पेक्षा कमी आहे.

✓ ६ मिनीट वॉक टेस्टनंतर ज्यांना धाप लागते किंवा ऑक्सिजन ९३ पेक्षा कमी होतो.

✓ ज्यांना मध्यम ते गंभीर स्वरूपाचा न्यूमोनिया आहे.

✓ ज्यांना सतत तीव्र ताप आहे.

✓ रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत बिघाडाच्या खुणा.