अपघातग्रस्तांसाठी मदतीचे हात!

पांडुरंग सरोदे
बुधवार, 16 मे 2018

पुणे - बाइकवेडा नीलय १९ फेब्रुवारीला सकाळी साडेआठ वाजता आपल्या बाइकवरून बाणेर येथील रस्त्यावरून जात होता. त्या वेळी त्याची बाइक घसरून विजेच्या खांबावर धडकली. नीलय गंभीर जखमी झाला. हळूहळू त्याची शुद्ध हरपत असतानाच ही घटना पाहणाऱ्या एका व्यक्तीने बघ्याची भूमिका न घेता नीलयला रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले... या घटनेपासून धडा घेऊन ‘लाइफ सेव्हिंग फाउंडेशन’ या संस्थेद्वारे तरुण स्वयंसेवक एकत्र येत अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी जागृती करीत आहेत. अपघातग्रस्तांचे प्राण वाचविण्यासाठी ते धडपडताहेत.

शहराच्या वेगवेगळ्या भागात दररोज घडणाऱ्या अपघातांमध्ये अनेक नागरिक केवळ ‘गोल्डन अवर्स’मध्ये मदत व उपचार न मिळाल्यामुळे मृत्युमुखी पडतात. नीलयच्या अपघातावेळी देवेंद्र पाठक हे त्याच्या मदतीसाठी धावून आले. त्यामुळे नीलयचे प्राण वाचले, मात्र दररोजच्या अपघातांच्या घटनांमध्ये जखमी होणाऱ्यांचे काय, असा प्रश्‍न पडल्यामुळेच पाठक यांनी अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, वाहनचालकांनी हेल्मेट, सीट बेल्टचा वापर करावा, याबाबत अधिकाधिक जागृती करण्याच्या उद्देशाने ‘लाइफ सेव्हिंग फाउंडेशन’ची स्थापना केली. त्याद्वारे काही स्वयंसेवकांच्या मदतीने ते दर रविवारी जनजागृती मोहीम राबवीत आहेत.

त्यामध्ये आता विद्यार्थी, नोकरदारांपासून व्यावसायिकांसह अनेकांनी स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

पाठक म्हणाले, ‘‘पहिल्या टप्प्यात अभियांत्रिकी महाविद्यालयाचे दहा विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून आमच्या उपक्रमात सहभागी झाले होते. आता वकील, व्यावसायिक, नोकरदार स्वयंसेवक म्हणून पुढे येत असून, ही संख्या ४० पर्यंत गेली आहे. अपघातग्रस्तांचे जीव वाचविण्यासाठी नागरिक म्हणून काय करायला पाहिजे, याचे महत्त्व स्वयंसेवक नागरिकांना पटवून देतात.’’
टाटा मोटर्समध्ये सहायक अभियंता असणाऱ्या भाग्यश्री कुलकर्णी या उपक्रमात स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहेत. त्या म्हणाल्या, ‘‘अपघात घडल्यानंतर पहिल्यांदा त्यांना मदत मिळणे गरजेचे असते. त्यासाठी इतर कोणी मदत करेल, यापेक्षा आपण स्वतः कशी मदत करू, हा विचार केला पाहिजे.’’

वर्ष      अपघात    मृत्यू    गंभीर 
२०१५   ४१९    ४३८   १२०५ 

२०१६  ३९७     ४१०   ६७० 
२०१७  ३६०     ३६८    ------ 
२०१८   १०७    ११५
-------------------------------------
तीन वर्षांतील अपघातातील मृतांची संख्या - १३३१

अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर्स’मध्ये मदत करणाऱ्या नागरिकांना कोणतीही माहिती पोलिसांना सांगणे बंधनकारक नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. त्यामुळे पोलिसांकडून मदतकर्त्यांना कोणताही त्रास होत नाही. याउलट पोलिसही प्रत्येक जखमी व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी मदतकर्त्यांना सहकार्य करतात.’’ 
- अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग 

देवेंद्र पाठक यांनी ‘गोल्डन अवर’मध्ये नीलयला रुग्णालयात पोचविले. त्यामुळेच नीलयचे प्राण वाचले. पोलिसांनीही चांगले सहकार्य केले. पाठक हे तत्काळ मदतीला आल्यामुळे माझा नीलय मला मिळाला. याच पद्धतीने प्रत्येक नागरिकाने अपघाताच्या घटनामध्ये मदतीचा हात दिला, तर हजारो जीव वाचू शकतील.
- प्रफुल्ल पाटील, अपघातग्रस्त नीलयचे वडील.

Web Title: life saving foundation help support