अंधार हटविण्यासाठी खांद्यावर रोहित्राचा भार (व्हिडिओ)

स्वाती कोळी
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

वेल्हे - छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी राजगड व शेवटची राजधानी रायगड. या दोन्ही राजधानींना जोडणाऱ्या ऐतिहासिक मार्गावरील वेल्हे तालुक्‍यातील अडीचशे लोकवस्तीची ऐतिहासिक ‘रायदंडवाडी’. स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही या २५० लोकसंख्येच्या वाडीत पायाभूत सुविधांची वानवा असल्याचे धक्कादायक चित्र पुढे आले आहे.

वेल्हे - छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी राजगड व शेवटची राजधानी रायगड. या दोन्ही राजधानींना जोडणाऱ्या ऐतिहासिक मार्गावरील वेल्हे तालुक्‍यातील अडीचशे लोकवस्तीची ऐतिहासिक ‘रायदंडवाडी’. स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही या २५० लोकसंख्येच्या वाडीत पायाभूत सुविधांची वानवा असल्याचे धक्कादायक चित्र पुढे आले आहे.

अनेक वर्षे साहित्य डोक्‍यावर व खांद्यावर घेऊन चार-पाच किलोमीटरची डोंगरदऱ्यांतली पायवाट तुडवीत स्वतःचे आयुष्य घालविलेल्या या वस्तीवरील नागरिकांना मात्र आपल्या चिमुकल्यांच्या भविष्याची चिंता सतावू लागली आहे. आपली मुले आपल्यासारखे अंधारात जीवन जगू नयेत यासाठी महावितरण कार्यालयाचे उंबरठे झिजविणाऱ्या नागरिकांवर मेहेरबान होऊन घिसरपर्यंत रोहित्र आम्ही आणून देतो तेथून पुढे तुम्ही कसे न्यायचे ते न्या, असे म्हणत महावितरणने आपले सोपस्कार पार पाडले, अन्‌ पाच किलोमीटर अलीकडेच असलेल्या घिसरला ६५ केव्हीचे जवळपास सव्वा टन वजनाचे रोहित्र नेऊन ठेवले. वेल्ह्यावरून रायदंडवाडीला जायचे तर घिसरमार्गे. कसाबसा घिसरपर्यंत रस्ता झालेला तोही अगदी तकलादू.

पावसाळ्यात राहतो की वाहून जातो असाच. तेथून पुढे मात्र पायी चालण्याशिवाय पर्याय उरत नाही. रायदंडवाडीच्या नागरिकांना प्रश्न पडला की येथून पुढे दोन उंचच उंच डोंगर, खोल दऱ्या, झऱ्यांची पाऊलवाट, खाचखळगे तुडवीत तब्बल चार ते पाच किलोमीटरचे अंतर कापायचे कसे? मुलांचे भवितव्य उज्ज्वल करायचे असेल तर हे दिव्य पार करावेच लागेल या निर्धाराने गावातील काही तरुण व ज्येष्ठ मंडळी पुढे आली. रामभाऊ कचरे, कैलास कचरे, धोंडिबा कचरे, बबन कचरे, कोंडिबा कचरे, विलास कचरे व इतर नागरिकांनी पुढाकार घेत खांद्यावरून रोहित्र मंगळवारी (ता. १८) रायदंडवाडीत पोचविले. हे चित्तथरारक चित्र पाहिले की अंगावर काटा उभा राहतो.

आता तरी रस्ता होणार का?
निवडणुका आल्या की येथील नागरिकांना केवळ आश्‍वासनांच्या खैरातीशिवाय दुसरे काही मिळतच नाही. काही सुविधा मागायला जावे तर अधिकाऱ्यांचा एकच सवाल असतो आणि तोही अगदी समोरच्याला निरुत्तर करेल असा. रस्ताच नाही त्यामुळे इतर पायाभूत सुविधा पोचवायच्या कशा? हा एकच प्रश्‍न येथील नागरिकांचे तोंड बंद करतो. त्यामुळे येथील नागरिक वर्षानुवर्षे केवळ रस्त्याची आग्रही मागणी करून हतबल झाले आहेत. या महत्त्वाच्या विषयाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभाग आता तरी गांभीर्याने पाहतील का, हा खरा प्रश्‍न आहे.

रोहित्र नेताना आम्हाला खूप त्रास झाला. चार किलोमीटरचे अंतर कापायला दोन दिवस लागले. आम्ही सहन केलेल्या या मरणयातना आमच्या पुढच्या पिढीच्या नशिबी येऊ नये यासाठी आमदार, खासदार यांनी आम्हाला फक्त रस्ता करून द्यावा. आमच्या अनेक पिढ्या त्यांचे ऋणी राहतील.
- रामभाऊ कचरे, ग्रामस्थ

Web Title: Light Electricity Transformer Raidandwadi