वाकाटक राजवंशावर पडणार प्रकाशझोत

दिलीप कुऱ्हाडे 
शनिवार, 12 मे 2018

पुणे - नागपुरातील रामटेक येथे प्राचीन वाकाटक राजवंशाची राजधानी असलेल्या नंदीवर्धन या शहराचे उत्खनन केले आहे. येथील पुरातत्त्वीय साधनांचा वापर करून सातवाहन वंशज कोण होते, वाकाटक आणि सातवाहन यांच्यामध्ये साम्य होते का, याचा निष्कर्ष काढला जाणार असल्याची माहिती डेक्कन कॉलेजचे  कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांनी दिली.

पुणे - नागपुरातील रामटेक येथे प्राचीन वाकाटक राजवंशाची राजधानी असलेल्या नंदीवर्धन या शहराचे उत्खनन केले आहे. येथील पुरातत्त्वीय साधनांचा वापर करून सातवाहन वंशज कोण होते, वाकाटक आणि सातवाहन यांच्यामध्ये साम्य होते का, याचा निष्कर्ष काढला जाणार असल्याची माहिती डेक्कन कॉलेजचे  कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांनी दिली.

या संदर्भात शिंदे म्हणाले, ‘‘राज्याचे पुरातत्त्व आणि वस्तूसंग्रहालये विभागाचे सहायक संचालक डॉ. विराग सोनटक्के आणि डेक्कन कॉलेजच्या प्राचीन भारतीय इतिहास संशोधन आणि पुरातत्त्व विभागाचे डॉ. शंतनू वैद्य आणि डॉ. श्रीकांत गणवीर यांच्या निदर्शनाखाली दोन वर्षांपासून हे उत्खनन सुरू होते. सातवाहन वंशजांचा कालखंड इ. स.पूर्व दुसरे व तिसरे शतक आहे. तर वाकाटक राजवंशाने इ. स. तिसरे शतक उत्तरार्ध ते पाचवे शतक उत्तरार्ध दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य प्रदेशातील काही प्रदेशांवर राज्य केले. वाकाटक राजवंशाने नंदिवर्धन (आजचे नगरधन) येथून अकरा ताम्रपट लिहिले होते. त्यावरून वाकाटक साम्राजाच्या इतिहासात प्राचिन नगरधनचे महत्त्व सिद्ध होते. मात्र पुरातत्वीय साधनांच्या माध्यमातून संशोधन करणे आवश्‍यक होते.’’

इ. स. ३५० च्या दरम्यान वाकाटक सम्राट पृथ्विषेण याने वाकाटक साम्राज्याची राजधानी पद्‌मपूरवरून नंदिवर्धनला स्थलांतरित केली. वाकाटक पूर्वकालीन नागरवस्तीचे शहर होते. याची पुरातत्त्वीय शहानिशा केली असून, वाकाटक कालखंडातील वसाहतिक रचना आणि नगररचनेबाबत माहिती मिळते. येथील मध्ययुगीन किल्ल्याच्या परिसरात उत्खननात प्रारंभिक लोह युगाशी संबंधित बांधकामांचे अवशेष आढळून आले आहेत. फरसबंदीच्या अवशेषांखालील स्तरातून अनुक्रमणे वाकाटक, मौर्य कालखंड आणि प्रारंभिक लोह युगाशी संबंधित बांधकामांचे अवशेष सापडले.

पुरातन वस्तूंचे अवशेष सापडले
उत्खननात नाणी, मुद्रा, दगडी प्रतिमा, हाडे व हस्तदंतीच्या वस्तू, मणी, बांगड्या आदी पुरातन वस्तूंचे अवशेष सापडले आहेत. घोडा, बैल, हत्ती, चिमणी, मासा, बदक आदींच्या मृण्मय प्रतिमा मिळाल्या आहेत. या प्रतिमांचा खेळणी म्हणून किंवा धार्मिक विधींसाठी वापर होत असावा. आभूषणांमध्ये कर्णभूषणे, पदके आणि मण्यांचा समावेश आहे. दगडी वस्तूंमध्ये दैनंदिन जीवनात उपयोगात येणाऱ्या वस्तू तसेच नृसिंह, विष्णू, गणपती, योगेश्‍वरी, लज्जागौरी आदींच्या प्रतिमांचा समावेश आहे. उत्खननात डेक्कन कॉलेजचे विद्यार्थी सुकेन शाह, जयेंद्र जोगळेकर, रुषल उनकुळे, प्रवीण कुमार, भक्ती गोहिल, अकियला इमचेंन, संजय कृष्णा, अभिरुची ओक, प्रमोद चव्हाण, अश्‍विन मेश्राम, प्रमोद रामटेके यांनी सहभाग घेतला.

Web Title: Light of the Wakatak