'केवायसी'च्या आधारे काढले परस्पर कर्ज

Loan fraud by using KYC documents in Pune
Loan fraud by using KYC documents in Pune

पुणे : कोणतेही कर्ज घेतलेले नसताना एका राष्ट्रीयकृत बॅंकेत आपल्या नावावर पावणेसहा लाख रुपयांचे कर्ज थकले आहे, हे समजल्यावर खंडू इंगळे हा युवक हवालदिल झाला. खंडू संबंधित बॅंकेत गेला, पोलिसांकडेही पोचला. चिकाटीने पाठपुरावा केल्यावर त्याच्या बनावट स्वाक्षऱ्या त्या बॅंकेत झाल्याचे त्याला समजले. मग त्याला आठवले की, एका शैक्षणिक संस्थेत 'एमबीए' करण्यासाठी त्याने दिलेल्या वैयक्तिक तपशिलाची कागदपत्रे (केवायसी) वापरून परस्पर कर्ज काढले आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे संपर्क साधल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. खंडूप्रमाणे अशा प्रकारे 32 जणांची फसवणूक झाल्याचे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. 

खंडू (वय 37) हा अप्पर इंदिरानगरमध्ये राहतो. त्याच परिसरातील एका कथित शैक्षणिक संस्थेत 2012 मध्ये व्यवस्थापनशास्त्र शाखेची (एमबीए) पदवी घेण्यासाठी त्याने संपर्क साधला. शुल्कासाठी राष्ट्रीयकृत बॅंकेतून कर्ज करून देतो, असेही त्याला सांगण्यात आले. त्यामुळे खंडूने त्याच्याकडील दहावी-बारावी आणि पदवीच्या गुणपत्रिका, वीजबिल, पॅन कार्ड आदी वैयक्तिक तपशिलाची कागदपत्रे (केवायसी) त्या संस्थेत जमा केली; परंतु त्याने प्रवेश घेतला नाही. संस्थेत दिलेली कागदपत्रे त्याने परत घेतली नव्हती. त्यानंतर पाच वर्षे काहीच झाले नाही.

खंडूला कर्ज हवे होते म्हणून त्याने ऑगस्ट महिन्यात स्वतःचा 'सीबिल'वर (क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो लिमिटेड) स्कोर तपासला. तेव्हा त्याला राष्ट्रीयकृत बॅंकेत त्याच्या नावावर सुमारे पावणेसहा लाख रुपयांच्या कर्जाची व्याजासह थकबाकी असल्याचे दिसून आले. खंडू सप्टेंबरमध्ये संबंधित बॅंकेत गेला. त्याचवेळी पोलिसांकडे गेला; परंतु त्याला दाद मिळेना. सुमारे दोन महिने कोंढवा पोलिसांकडे हेलपाटे मारले. त्यानंतर त्याने 'सकाळ'शी संपर्क साधला. 'सकाळ'च्या प्रतिनिधींनी कोंढवा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर या प्रकरणाची चक्रे फिरली आणि चौकशी सुरू झाली. 

पोलिसांनी तपासणी केल्यानंतर खंडूच्या बनावट स्वाक्षऱ्या करून सुमारे अडीच लाख रुपयांचे कर्ज काढल्याचे दिसून आले. या कर्जाचे हप्ते भरलेच नव्हते. त्यामुळे ही थकबाकी पावणेसहा लाखांवर पोचली आहे. पोलिसांनी चौकशी केल्यावर आढळले की, त्या शैक्षणिक संस्थेने सुमारे 32 जणांच्या नावावर अशी कर्जे काढली असून, त्याची थकबाकी आता लाखो रुपयांवर गेली आहे. संबंधित राष्ट्रीयकृत बॅंकेचा विधी विभागही याबाबत पाठपुरावा करीत आहे. मात्र, खंडूच्या चिकाटीमुळे हा गैरव्यवहार उघड झाला आहे. त्याची व्याप्ती मोठी असावी, अशी शक्‍यता दिसत आहे. 

वैयक्तिक तपशिलाची कागदपत्रे बॅंका, वित्तसंस्था किंवा काही खरेदी करताना देण्याची वेळ आली तर नागरिकांनी त्या खरेदीच्या उद्देशासाठीच ती कागदपत्रे दिली आहेत, असे त्यावर स्पष्टपणे नमूद करावे. उदा. कर्ज घेताना, कर्ज घेण्यासाठीच आधार, पॅन कार्ड, पासपोर्टची छायांकित प्रत दिली आहे, असे म्हणावे आणि त्यानंतरच त्यावर स्वाक्षरी करावी. तसेच, एखाद्या संस्थेत कागदपत्रे दिली आणि त्यानंतर तेथे काम झाले नाही, तर संबंधित कागदपत्रे आठवणीने परत घ्यावीत. महत्त्वाचे म्हणजे छायांकित प्रतींवर स्वाक्षरी करताना काळ्या शाईच्या पेनाने ती करू नये. निळ्या शाईचा किंवा अन्य रंगाच्या पेनाने त्यावर स्वाक्षरी करावी. 
- अभय माटे, चार्टड अकाउंटंट 

माझ्या नावावर काढलेल्या कर्जाचे सुमारे 15-20 हप्तेही परस्पर भरल्याचे दिसून आले आहे. ते पैसे कोणी भरले, हे बॅंक सांगत नाही. कर्ज माझ्या नावावर. मात्र, मलाच माहिती नाही. संबंधित शैक्षणिक संस्था कधी बंद झाली, हे माहीत नाही. हा सगळाच प्रकार चक्रावणारा आहे. पोलिसच आता त्याचा छडा लावू शकतील. 
- खंडू इंगळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com