अभिनयासह चित्रीकरणाचे ठिकाणही महत्त्वाचे | PIFF Mahotsav | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 International Film in Piff
अभिनयासह चित्रीकरणाचे ठिकाणही महत्त्वाचे

अभिनयासह चित्रीकरणाचे ठिकाणही महत्त्वाचे

पुणे - चित्रपटांमध्ये व्यक्तिरेखांना न्याय देणारे नायक-नायिका महत्त्वाचे असतातच. मात्र त्यासह चित्रीकरणाचे ठिकाण देखील महत्त्वाची भूमिका पार पाडतात, असा सूर राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे झालेल्या ‘कँडिड टॉक्स’ या कार्यक्रमात बुधवारी उमटला.

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातर्फे सुरू असलेल्या १९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत (पिफ) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत ‘पिफ’चे कलात्मक संचालक समर नखाते यांनी ‘बारा बाय बारा’ चित्रपटाचे दिग्दर्शक गौरव मदान, निर्माते, पटकथाकार, सिनेमॅटोग्राफर सनी लाहिरी, ‘लैला और सात गीत’ चित्रपटाचे दिग्दर्शक पुष्पेंद्र सिंग, ‘ब्रिज’ चित्रपटाचे दिग्दर्शक क्रिपाल कोलिता, ‘जून’ चित्रपटाचे दिग्दर्शक वैभव खिस्ती व सुहृद गोडबोले, अभिनेत्री रेशम, ‘आरके’ चित्रपटाचे दिग्दर्शक व अभिनेते रजत कपूर आदींशी संवाद साधला.

‘बारा बाय बारा बाय’ चित्रपटाचा नायक हा वाराणसीच्या मनकर्णिका घाटावर डेथ फोटोग्राफी करणारा शेवटचा छायाचित्रकार आहे. स्मार्टफोनच्या जमान्यात नायकाची ओळखही पुसली जात आहे. शहर आणि त्याच्या आयुष्यात होणाऱ्या या स्थित्यंतरापासून आपल्या कुटुंबाला बाजूला ठेवायची नायकाची इच्छा आणि त्याचा प्रवास या चित्रपटात दाखवायचा प्रयत्न केला असल्याचे दिग्दर्शक गौरव मदान यांनी सांगितले.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढू लागला; १८४ नवे कोरोना रुग्ण

तर १४ व्या शतकात काश्मीरमधील संत लल्लेश्वरी देवी किंवा लाल देड यांच्या कवितांवर प्रेरित ‘लैला और सात गीत’ हा चित्रपट काश्मीरमधील भटक्या मेंढपाळ समाजातील लैलाची कथा प्रेक्षकांना सांगतो. काश्मीरचे सौंदर्य, हिमालयाच्या पर्वतरांगा यांच्या पार्श्वभूमीवर घटणारी लैलाची कथा स्त्रीवादी विचारांसोबतच निसर्गाशी असलेले मानवी नाते अलगदपणे उलगडण्याचा प्रयत्न करते, असे चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक पुष्पेंद्र सिंग म्हणाले.

...तरीही आई मानतात

ब्रह्मपुत्रा नदीची एक उपनदी असलेल्या नदीच्या काठावर वसलेल्या गावात किशोरवयीन मुलीची संघर्षमय कथा सांगण्याचा प्रयत्न दिग्दर्शक क्रिपाल कोलिता यांनी ‘ब्रिज’ या आसामी चित्रपटात केला आहे. याबद्दल ते म्हणाले, ‘आसाममध्ये घर, संसार पुराने उद्‍ध्वस्त होतात. तरीही येथील लोक नदीला आई मानत तिची पूजा करतात. जीवनातील संघर्षातून पार होत नव्या दिवसाची वाट दाखविणारा विचार चित्रपटातून दाखविला आहे.’

Web Title: Location Of The Shooting Is Also Important Along With The Acting

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Acting fieldPIFF
go to top