सासवड शहरात आज रात्रीपासून आठवडाभर लाॅकडाउन

श्रीकृष्ण नेवसे
शुक्रवार, 3 जुलै 2020

संसर्गातून कोरोनाची बाधा होण्याचा हा वेग रोखण्यासाठी जे नियम व अटी घालून दिल्या, त्याला आणि शिस्तीला हरताळ फासला जातोय. शिवाय अनेक जाणकारांकडून लाॅकडाउनची मागणी होत होती.

सासवड (पुणे) :  पुरंदर तालुक्यतील सासवड हरात कोरोनाची बाधा झालेले आतापर्यंत 69 रुग्ण आढळून आले आहेत. तसेच, शहरातील कोरोनाची साखळी तुटत नाही. त्यामुळे सासवड शहरात आज रात्रीपासून येत्या 11 जुलैपर्यंत आठवड्याचा लाॅकडाउन केला आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी हा निर्णय रात्री प्रसिद्ध पत्रकाद्वारे जाहीर केला.

कोरोनामुळे अनेक व्यवसाय अडचणीत, पण हा व्यवसाय तेजीत

मागील जनता कर्फ्यु शिथिल झाल्यावर पाच दिवसात 40 रुग्ण सापडले. संसर्गातून कोरोनाची बाधा होण्याचा हा वेग रोखण्यासाठी जे नियम व अटी घालून दिल्या, त्याला आणि शिस्तीला हरताळ फासला जातोय. शिवाय अनेक जाणकारांकडून लाॅकडाउनची मागणी होत होती. त्यातून आणि मुख्याधिकाऱ्यांना असलेल्या अधिकारातून हा लाॅकडाउन केला गेला. या निर्णयानुसार उद्यापासून शहरात मेडीकल, दवाखाने, तपासणी प्रयोगशाळा पूर्णवेळ सुरु राहतील. दूध केंद्र सकाळी सहा ते नऊ व किराणा, कृषी केंद्र, भाजी घरपोच सेवा राहील. यावर लक्ष ठेवण्यासाठी आठ पथके तैनात आहेत.

कोरोनामुक्त रुग्ण घरी परतल्यावर स्वागत करताय तर... 

सासवडला गेल्या दीड आठवड्यात कोरोनाचे रुग्ण सापडण्यात खंड नव्हता. त्यामुळे सासवड शहरातील नागरिक भयभीत झाले आहे. एका सासवड शहरातील रुग्ण संख्या आज 69 वर पोचून पुरंदर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या 98 वर पोचली आहे. शतकाच्या उंबरठ्यावर तालुका आहे आणि पाऊण शतक एकट्या सासवडनेच पूर्ण केले. तालुक्यातील एकुण पाॅझीटिव्ह रुग्णातील 70 टक्के रुग्ण सासवड शहरातील आहेत.त्यातून शहरातील लाॅकडाऊन हा नव्याने जाहीर केला आहे. 

पुणे व बाहेर गावाहून नोकरी किंवा व्यवसायानिमित्त नित्यपणे जा - ये करणारांनी नगरपालिकेत नोंद करून कोरोनाबाबत प्रमाणपत्र सादर करायचे आहे. अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाईचे संकेतही मुख्यधिकारी जळक यांनी दिलेत. त्याकरिता घरापर्यंत सर्व्हेक्षण सुरु केले आहे. माहिती लपविली तरीही कारवाई आहे; असेही स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown for a week in Saswad city