लोहगाव विमानतळ देशात तिसरे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

पुणे - प्रवासी संख्येच्या वाढीमध्ये लोहगाव विमानतळाने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. तब्बल 20.6 टक्‍क्‍यांनी प्रवासी संख्या वाढली आहे. कोलकता पहिल्या, तर अहमदाबाद विमानतळ दुसऱ्या स्थानावर आहे. 

पुणे - प्रवासी संख्येच्या वाढीमध्ये लोहगाव विमानतळाने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. तब्बल 20.6 टक्‍क्‍यांनी प्रवासी संख्या वाढली आहे. कोलकता पहिल्या, तर अहमदाबाद विमानतळ दुसऱ्या स्थानावर आहे. 

देशातील दहा विमानतळांवरून दरवर्षी पन्नास लाखांपेक्षा जास्त प्रवाशांची ये- जा होते. लोहगाव विमातळावरून 2017-18 या वर्षात 81 लाख 60 हजार प्रवाशांची वाहतूक झाली होती. त्यामुळे देशात ते विमानतळ नवव्या स्थानावर होते. परंतु, प्रवासी संख्यावाढीचा लोहगाव विमानतळाचा वेग 20.6 टक्के असल्यामुळ ते तिसऱ्या स्थानावर आले आहे. पुण्यातून मध्यम आणि हलक्‍या आकाराच्या विमानांचीच वाहतूक होत असूनही, पुण्यात प्रवासीवाढीचा वेग मोठा आहे, अशी माहिती लोहगाव विमानतळाचे संचालक अजय कुमार यांनी दिली. लोहगाव विमानतळावरून गेल्या आर्थिक वर्षात 78 लाख 90 हजार प्रवाशांची देशांतर्गत वाहतूक झाली होती. त्यामुळे प्रवासी संख्येच्या वाढीचा वेग 21.2 टक्‍क्‍यांवर पोचला आहे, असेही त्यांनी सांगितले. 

एअरपोर्ट सर्व्हिस क्‍वालिटी (एएसक्‍यू) या संस्थेने याबाबतचे व्यापक सर्वेक्षण केले आहे. 2016-17 मध्ये या विमानतळाचे स्थान देशात दहावे होते. देशातील पहिल्या 10 विमानतळांमध्ये बंगळुरू, हैदराबाद, कोचीन, गोवा, अहमदाबाद, दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकता आणि पुण्याचा समावेश आहे. पुढील वर्षात या विमानतळावरील ही प्रवासी संख्या 1 कोटींपेक्षा अधिक होईल, असा अंदाज विमान वाहतूक क्षेत्रातून व्यक्त होत आहे. 

लोहगाव विमानतळावर प्रवाशांची संख्या वाढत असल्यामुळे विस्तारीकरण, नवा विमानतळ या पर्यायांची तातडीने अंमलबजावणी व्हायला हवी. व्हीआयपी लाउंजही लहान आहे. क्राय रूम किंवा फीडिंग रूम यांसारख्या सुविधांची गरज आहे. सिक्‍युरिटीसाठी सकाळी खूप मोठी रांग असते. पुण्यातील रस्त्यांप्रमाणे विमानतळाचीही ओव्हर क्राउडेड अशी अवस्था होऊ नये, असे वाटते. 
- सलील कुलकर्णी, गायक 

Web Title: lohegaon airport is the third in the country