Anganwadi Workers : अंगणवाडी सेविकांच्या समर्थनार्थ आयुक्त कार्यालयावर लोकपाठिंबा मोर्चा

मानधनवाढीच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडीसेविका या ४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर आहेत.
anganwadi workers
anganwadi workersesakal

पुणे - राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या बेमुदत बंदला आणि नागपूर येथील राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर शुक्रवारी (ता. १५) काढण्यात आलेल्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने आज विभागीय आयुक्त कार्यालयावर लोकपाठिंबा मोर्चा काढण्यात आला.

अंगणवाडी कर्मचारी सभेचे राज्य अध्यक्ष नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय ते विभागीय आयुक्त कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला.

मानधनवाढीच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडीसेविका या ४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर आहेत. मात्र या संपाचा अकरावा दिवस असूनही, राज्य सरकारने अद्यापही या संपाची दखल घेतली नाही. त्यामुळे राज्य सरकारचे विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडीसेविका आणि मदतनिसांनी शुक्रवारी (ता. १५) नागपूर येथील विधिमंडळ अधिवेशनावर मोर्चा काढला.

या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अंगणवाडी कर्मचारी सभेच्यावतीने या अंगणवाडीसेविका लोकपाठिंबा मोर्चाचे आयोजन कऱण्यात आले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडीसेविका व मदतनिसांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, यानुसार वेतन, भविष्य निर्वाह निधी आणि निवृत्तिवेतन देण्यात यावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युटीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतिम निकालाची त्वरित अंमलबजावणी करावी, न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी कर्मचारी ही वैधानिक पदे असून त्यांना मिळणारा मोबदला हा वेतनच असल्याने, त्यांना सरकारी कर्मचारी म्हणून घोषित करावे, अंगणवाडीसेविका व मदतनिसांना त्वरित भरीव मानधनवाढ जाहीर करावी, मदतनीस व सेविकांचे मानधन अनुक्रमे किमान १८ हजार ते २६ हजारापर्यंत करण्यात यावे.

मानधन हे महागाई निर्देशांकाला जोडून, दर सहा महिन्यांनी त्यात निर्देशांकानुसार वाढ करावी, महिला व बालविकास मंत्र्यांशी झालेल्या चर्चेनुसार सेवा समाप्तीनंतर विना योगदान मासिक निर्वाह भत्ता (पेन्शन) देण्याबाबतचा प्रस्ताव चालू हिवाळी अधिवेशनात मंजूर करावा, महानगरपालिका हद्दीतील जागेचे निकष शिथिल करून अंगणवाड्यांसाठी प्रति अंगणवाडी किमान पाच हजार ते कमाल आठ हजार रुपये भाडे मंजूर करण्यात यावे.

पोषण आहाराचा सध्याचा ८ रुपये दर अत्यल्प असून, यामुळे कुपोषण निर्मूलन होण्याऐवजी उलट त्यात वाढ होत आहे. त्यामुळे हा दर सर्वसाधारण बालकांसाठी प्रत्येकी १६ रुपये व अति कुपोषित बालकांसाठी प्रत्येकी २४ रुपये करण्यात यावा आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा सुरु झाला. तेथून तो सेंट्रल बिल्डिंग, साधू वासवानी पुतळा, विधानभवन पोलिस चौकीमार्गे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर नेण्यात आला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी विविध विभागातील नागरिकांनी अंगणवाडी सेविकांना पाठिंबा दिला. अंगणवाडीसेविका व मदतनीस या देशाच्या मानवी विकासदूत आहेत.

पूर्व प्राथमिक शिक्षण, पूरक पोषक आहार, लसीकरण, लोकसंख्या शिक्षण आदी कामांद्वारे त्या देशाची भावी पिढी घडवत आहेत. मात्र त्यांची अतिशय अल्प मानधन देऊन बोळवण केली जात असल्याचे यावेळी बोलताना नितीन पवार यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com