सुधारणांना टिळकांचा विरोध नव्हता - सुबोध भावे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

‘लोकमान्य टिळक यांनी सुधारणांना कधीच विरोध केला नाही. सुधारणेच्या नावाखाली ब्रिटिशांकडून इथल्या जनतेची फसवणूक होऊ नये, यासाठी त्यांचा प्रयत्न होता. कोणतीही सुधारणा बळजबरीने नाही, तर स्वयंप्रेरणेनेच व्हावी, हीच टिळकांची भूमिका होती,’’ असे मत अभिनेता सुबोध भावे यांनी रविवारी व्यक्त केले.

पुणे - ‘लोकमान्य टिळक यांनी सुधारणांना कधीच विरोध केला नाही. सुधारणेच्या नावाखाली ब्रिटिशांकडून इथल्या जनतेची फसवणूक होऊ नये, यासाठी त्यांचा प्रयत्न होता. कोणतीही सुधारणा बळजबरीने नाही, तर स्वयंप्रेरणेनेच व्हावी, हीच टिळकांची भूमिका होती,’’ असे मत अभिनेता सुबोध भावे यांनी रविवारी व्यक्त केले.

लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे लिखित ‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक’ या चरित्रग्रंथाची विशेष आवृत्ती ‘सकाळ’ प्रकाशनने प्रसिद्ध केली. या ग्रंथाचे प्रकाशन अभिनेता सुबोध भावे यांच्या हस्ते रविवारी सकाळ कार्यालयात झाले. या वेळी महापौर मुक्ता टिळक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक, ‘सकाळ’ प्रकाशनचे प्रमुख आशुतोष रामगीर उपस्थित होते.  

भावे म्हणाले, ‘‘टिळक यांच्यासह सर्व राष्ट्रपुरुष ज्ञानासाठी नाहीत, तर गुणांसाठी आहेत, असे आपल्या शालेय अभ्यासक्रमातून व्यक्त होते. त्यापलीकडे जाऊन राष्ट्रपुरुष समजून घेतले पाहिजेत. टिळकांनी आपल्या आयुष्यातील ४४ वर्षे लोककल्याण व स्वराज्यासाठी वेचली. शंभर वर्षांनंतरही आपल्याला टिळकांचा पुनःपुन्हा अभ्यास करावा वाटतो, ही महत्त्वाची बाब आहे. आजच्या पिढीला आगरकरांचे विचार सहज पटतील; पण टिळक समजून घेणे सोपे नाही.’’ 

महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘‘लोकमान्य टिळक यांनी त्यांच्या लेखनातून अतिशय साध्या, सोप्या व सुटसुटीत पद्धतीने स्वातंत्र्याचे वर्णन केले आहे. छोटी वाक्‍ये, उदाहरणांद्वारे त्यांनी स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून दिले आहे. लोकमान्यांच्या चरित्रातून दरवेळी काहीतरी नवे सापडते. त्यामुळे त्यांच्या चरित्राचा अभ्यास सातत्याने झाला पाहिजे.’’ 

डॉ. टिळक म्हणाले, ‘‘लोकमान्य टिळकांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला वेगळे अधिष्ठान प्राप्त करून दिले. ‘स्वदेशी आणि बहिष्कार’ या अहिंसक मार्गांचा वापर सर्वप्रथम लोकमान्यांनी केला आणि ही धुरा महात्मा गांधींनी पुढे नेली. टिळकांसारख्या राष्ट्रपुरुषांचे सतत स्मरण झाले पाहिजे.’’

डॉ. मोरे म्हणाले, ‘‘महापुरुषांची चरित्रे सातत्याने लिहिली जायला हवीत. त्या-त्या काळाच्या संदर्भातून महापुरुषांच्या चरित्राचा अभ्यास झाला पाहिजे. लोकमान्यांचे चरित्रलेखन यापूर्वी केले आहे, त्यांच्या विचारांचा मागोवाही या पुस्तकामध्ये घेतला आहे. राष्ट्राच्या हितासाठी लोकमान्यांसारख्या महापुरुषांचे विचार पोचविण्याचे काम केले पाहिजे.’’ सूत्रसंचालन ‘सकाळ प्रकाशन’च्या संपादक ऐश्वर्या कुमठेकर यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lokmanya Bal gangadhar Tilak Biography Publish Subodh Bhave