लोकमान्य टिळक पुरस्कार बाबा कल्याणी यांना जाहीर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारा’ने या वर्षी भारत फोर्ज कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी यांना गौरविण्यात येणार आहे.

पुणे - लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारा’ने या वर्षी भारत फोर्ज कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी यांना गौरविण्यात येणार आहे. 

ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी ट्रस्टचे विश्‍वस्त डॉ. रोहित टिळक उपस्थित होते. लोकमान्य टिळकांची ९९ वी पुण्यतिथी गुरुवारी (ता. १) आहे. त्या दिवशी सायंकाळी सव्वापाच वाजता टिळक स्मारक मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमात बाबा कल्याणी यांना हा पुरस्कार दिला जाईल. डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार असून, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. माजी केंद्रीय गृहमंत्री आणि टिळक स्मारक ट्रस्टचे विश्‍वस्त सुशीलकुमार शिंदे या वेळी उपस्थित असतील. 

कल्याणी उद्योग समूहाचा विस्तार करीत स्वदेशी उत्पादनांना जागतिक पातळीवर अग्रगण्य स्थान मिळवून देण्याचे कार्य बाबा कल्याणी यांनी केले आहे. याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये देखील त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यासाठी त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. 

सुवर्णपदक, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये असे पुरस्काराचे यंदाचे स्वरूप आहे. पुरस्काराचे हे ३६ वे वर्ष आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमात डॉ. दीपक टिळक यांनी लिहिलेल्या ‘लोकमान्य बी. जी. टिळक - द व्हिजनरी’ या इंग्रजी पुस्तकाचे आणि ‘काव्यातून टिळक दर्शन’ या लोकमान्यांवरील कवितांचा मागोवा घेणाऱ्या स्वप्नील पोरे लिखित पुस्तकाचे प्रकाशनही होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lokmanya Tilak award announced to Baba Kalyani