
लोकमान्यांचा पुतळा केसरीवाड्यात स्थापित
पुणे - मुंबईतील सरदार भवनात मूर्तिकार कै. केशव लेले यांनी १०२ वर्षांपूर्वी साकारलेला लोकमान्य टिळकांचा (Lokmanya Tilak) पूर्णाकृती पुतळा (Statue) केसरीवाड्यात शुक्रवारी स्थापित करण्यात आला. १९१९मध्ये लेले यांनी लोकमान्य टिळकांसमोर बसून तयार केलेला त्यांचा हा पुतळा आरामखुर्चीत बसलेल्या स्थितीत आहे. (Lokmanya Tilak Statue in Kesariwada Pune)
केसरीवाड्यात आयोजित कार्यक्रमात आमदार मुक्ता टिळक, शैलेश टिळक, शिल्पकार कै. केशव लेले यांचे चिरंजीव यशवंतराव लेले, त्यांची कन्या डॉ. चित्रा लेले, शिल्पकार अभिजित धोंडफळे तसेच कुणाल टिळक आणि चैत्राली टिळक आदी उपस्थित होते.
हेही वाचा: व्याजाच्या पैशातुन हवेत गोळीबार करून खूनाचा प्रयत्न
शैलेश टिळक म्हणाले, ‘‘लोकमान्यांचा हा पुतळा १९१९नंतर पुढील ८० वर्षे दादर येथे लेले कुटुंबीयांच्या निवासस्थानी ठेवला होता. त्यानंतर १९९९ मध्ये पुण्यातील महात्मा सोसायटी येथे वास्तव्य करणारी त्यांची नात डॉ. चित्रा लेले यांच्या घरी पुतळा हलविण्यात आला होता. तो चांगल्या ठिकाणी ठेवण्यात यावा अशी लेले कुटुंबीयांची इच्छा होती, तेव्हा लोकमान्यांचे निवासस्थान असलेल्या वास्तूचे नूतनीकरण होईल तेव्हा हा पुतळा तेथे स्थापित करू असे त्यांना सांगितले होते. आज गुरुपौर्णिमा आणि टिळक जयंतीच्या दिवशी पूर्णाकृती पुतळा स्थापित केला आहे.’’
वडिलांच्या निधनानंतर त्यांनी केलेला लोकमान्य टिळकांचा पुतळा माझ्याकडे होता. तो आम्ही जपला. माझ्यानंतर तो चांगल्या जागेत सुरक्षित राहावा अशी इच्छा असून तो इथे व्यवस्थित राहील, अशी भावना यशवंतराव लेले यांनी व्यक्त केले. पुतळ्याचे नूतनीकरण शिल्पकार अभिजित धोंडफळे यांनी केले आहे.
Web Title: Lokmanya Tilak Statue In Kesariwada Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..