Loksabha 2019 : आघाडी, युतीचे शक्तिप्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

रखरखत्या उन्हात पदयात्रा काढून मावळ लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार आणि महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत मंगळवारी (ता. ९) उमेदवारी अर्ज दाखल केले. पार्थ यांची पदयात्रा वाल्हेकरवाडीतून, तर बारणे यांची पदयात्रा आकुर्डीतील खंडोबा माळ येथून निघाली. यामुळे वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, आकुर्डी रेल्वेस्टेशन आणि खंडोबा माळ चौक, आकुर्डी गाव, म्हाळसाकांत चौक, प्राधिकरण परिसर घोषणाबाजीने दणाणून गेला.

पिंपरी - रखरखत्या उन्हात पदयात्रा काढून मावळ लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार आणि महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत मंगळवारी (ता. ९) उमेदवारी अर्ज दाखल केले. पार्थ यांची पदयात्रा वाल्हेकरवाडीतून, तर बारणे यांची पदयात्रा आकुर्डीतील खंडोबा माळ येथून निघाली. यामुळे वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, आकुर्डी रेल्वेस्टेशन आणि खंडोबा माळ चौक, आकुर्डी गाव, म्हाळसाकांत चौक, प्राधिकरण परिसर घोषणाबाजीने दणाणून गेला.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दुपारी सव्वाच्या सुमारास महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार कार्यालयाच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडले. त्याच वेळी त्यांचे प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे तिथे पोचले. दोघांनीही हसतमुखाने एकमेकांशी हस्तांदोलन करून शुभेच्छा दिल्या. त्या वेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे व पार्थ यांचे बंधू जय पवार आणि भाजपचे खासदार अमर साबळे, शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्यासह सर्वांच्याच चेहऱ्यावर हास्य फुलले.

ठाकरेंची गाडी प्रवेशद्वारापर्यंत
निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांच्या कार्यालय परिसरातील सर्वच रस्ते पोलिसांनी रहदारीसाठी बंद केले होते. अतिरिक्त पोलिस आयुक्त मकरंद रानडे स्वतः बंदोबस्ताला तैनात होते. पाचशे मीटर परिसरात बॅरिकेड लावले होते. उमेदवारांना बॅरिकेडच्या बाहेर वाहने उभे करून कार्यालयापर्यंत चालत जावे लागले. मात्र, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मोटारीला निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय इमारतीच्या (नवनगर विकास प्राधिकरण कार्यालय) प्रवेशद्वारापर्यंत प्रवेश देण्यात आला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. याबाबत अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे म्हणाले, ‘‘आदित्य ठाकरे यांना सुरक्षा वर्गवारी आहे. गर्दीमुळे त्यांना त्रास होऊ नये, यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय इमारतीच्या प्रवेशद्वारापर्यंत त्यांच्या वाहनाला परवानगी दिली.’’

बारणे यांची संपत्ती
उत्पन्न : ४५ लाख ५९ हजार ५७१ रुपये (२०१७-१८)   रोख रक्‍कम : ४८ लाख रुपये   बॅंक खात्यातील ठेवी :  ७२ लाख २३ हजार ६६०   शेअर्समधील गुंतवणूक : १ लाख ५९ हजार ९५०   राष्ट्रीय बचत योजनेतील गुंतवणूक : ११ लाख रुपये    वैयक्तिक कर्जे :  १० कोटी ८३ लाख ३६ हजार २६४   वाहने : मर्सिडीज बेंझ आणि टोयोटा फॉरच्युनर   दागिने : सोने आणि जडजवाहीर- ५१ लाख ७० हजार २२ रुपये.   एकूण जंगम मालमत्ता : १३ कोटी ७७ लाख ९४ हजार ६१०   एकूण स्थावर मालमत्ता : १ कोटी ६२ लाख २६ हजार ५००   शेतजमीन : मारुंजी, मावळ, मुळशी    आंदोलनाबाबत दाखल गुन्हे ः ४

पवार यांची संपत्ती 
उत्पन्न : १९ लाख ९७ हजार ३४३    ठेवी : ६५ लाख ६६ हजार ११०   शेअर्स : ९ लाख ६६ हजार १८४   गुंतवणूक : ३७ लाख ६६ हजार ४२७   देणगी : १ कोटी २९ लाख २६ हजार १०६   वाहन : ९ लाख ३१ हजार ५५४   सोने - २४ लाख १९ हजार ९००   व्याज येणे : ९० लाख १० हजार ८०९   एकूण जंगम मालमत्ता : ३ कोटी ६९ लाख ५४ हजार १६३   स्थावर मालमत्ता : १६ कोटी ४२ लाख ८५ हजार १७०   दायित्व : ९ कोटी ३६ लाख १३ हजार २९५   स्थावर मालमत्ता : सोनगाव, ढेकळवाडी व जळोची (ता. बारामती) आणि गोटावडे (ता. मुळशी) येथे शेतजमीन व शिवाजीनगर (पुणे) येथे बंगला.   गुन्हा : नाही.

Web Title: Loksabha Election 2019 Aghadi Yuti Rally Politics Shrirang Barne Parth Pawar