Voting
Voting

Loksabha 2019 : शहरात ओबीसींचे मतदान ठरणार निर्णायक

पुणे - शहरात अलीकडेच झालेली जातीय आंदोलने आणि मेळावे लक्षात घेता, लोकसभा निवडणुकीवरही जातिपातीचा प्रभाव राहील, अशी शक्‍यता अभ्यासक व्यक्त करीत आहेत. तसे झाल्यास अन्य मागासवर्गीय (ओबीसी) आणि त्या खालोखाल दलित घटक निर्णायक ठरेल, अशी चिन्हे आहेत.

शहरातील मतदारांची संख्या यंदा २१ लाखांवर पोचली आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा ही संख्या एक लाखाने वाढली आहे. त्यात प्रामुख्याने नवमतदारांचा समावेश आहे. शहराच्या लोकसंख्येत मराठा समाजाचे प्राबल्य आहे. शहरातील आठपैकी सहा विधानसभा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघात येतात. हडपसर आणि खडकवासला मतदारसंघ अनुक्रमे शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघाला जोडले आहेत. कोथरूड, पर्वती, तसेच शिवाजीनगर, कसबा मतदारसंघात काही भागात ब्राह्मण मतदारांचे प्राबल्य आहे. वडगाव शेरी, कॅंटोन्मेंट आणि पर्वतीच्या काही भागांत दलित समाजाचे मतदान महत्त्वाचे ठरणार आहे. तर, मोठ्या संख्येने असलेला अन्य मागासवर्गीय मतदार सहाही मतदरासंघांत विखुरलेला आहे.

शहरी भागात लोकसभेची निवडणूक जातीय समीकरणांवर होत नाही, असा यापूर्वीचा निष्कर्ष होता; परंतु, तीन वर्षांत मराठा समाजाचा क्रांती मोर्चा, दलित-मागासवर्गीयांची संविधान बचाव रॅली, तसेच अन्य जाती संघटनांचीही आंदोलने, मेळावे झाले. त्यामुळे काही प्रमाणात जातीबद्दलचा विचार वाढला आहे, असे निरीक्षण अभ्यासकांनी नोंदविले आहे. तसेच राजकीय पक्षांनीही या संक्रमणाचा विचार करून उमेदवार निश्‍चित करण्यास सुरवात केली आहे. अमराठी मतदारांचीही संख्या सुमारे लाखभर आहे. त्यांचाही कल या वेळी विचारात घ्यावा लागणार आहे.

उमेदवार ठरविताना पक्षाची प्रतिमाही महत्त्वाची ठरते. तसेच उमेदवार जाहीर झाल्यावर वेगवेगळ्या काही समीकरणांनुसार परिस्थितीत फरक पडतो; परंतु, सध्याची मतदारसंख्या आणि जातीनिहाय विचार केला, तर ओबीसी घटक महत्त्वाचा ठरू शकतो.
- डॉ. सुहास पळशीकर, राजकीय विश्‍लेषक

पुण्यातील दोन प्रमुख जाती समूहातून उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्यास ओबीसी मतदार निर्णायक भूमिका बजावतील, असे दिसते. तसेच दलित समाजाचे मतदानही महत्त्वपूर्ण ठरेल.
- प्रा. नितीन बिरमल, डॉ. आंबेडकर महाविद्यालय, येरवडा 

शहराची लोकसंख्या ः ३१ लाख २४ हजार ४५८ 
 हिंदू -     २४ लाख ८१ हजार ६२७
 मुस्लिम -     ४ लाख ४४ हजार 
 बौद्ध -     १ लाख २३ हजार १७९ 
 जैन -     ७६ हजार ४४१
 ख्रिश्‍चन -     ६७ हजार ८०८ 
 शीख -     १३ हजार ५५८
 अन्य -     १६ हजार
 अनुसूचित जाती (एससी) -     ४ लाख १९ हजार ३९६
 अनुसूचित जमाती (एसटी) -     ३४ हजार ०२५
(स्त्रोत - जनगणना २०११)

 मराठा मतदार :    सुमारे ५ लाख
 ब्राह्मण मतदार :     सुमारे ५ लाख
 विशेष मागासवर्गीय :     सुमारे ६ लाख
 दलित मतदार :     सुमारे ५ लाख 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com