राममंदिराच्या मुद्याला निवडणुकीनंतर गती - आदित्य ठाकरे

किल्ले शिवनेरी (ता. जुन्नर) - शिवजयंतीनिमित्त शनिवारी शिवजन्माचा पाळणा हलविताना युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, अनिल देसाई, आमदार शरद सोनवणे व इतर.
किल्ले शिवनेरी (ता. जुन्नर) - शिवजयंतीनिमित्त शनिवारी शिवजन्माचा पाळणा हलविताना युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, अनिल देसाई, आमदार शरद सोनवणे व इतर.

आपटाळे - ‘लोकसभा निवडणुकीनंतर अयोध्येतील राममंदिराच्या प्रश्नाला गती येईल, तसेच नाणार, शेतकरी पीकविमा, कर्जमाफी यासारखे प्रश्न शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागले आहेत,’’ असे प्रतिपादन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.  

तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी ठाकरे किल्ले शिवनेरी (ता. जुन्नर) येथे आले होते. त्या वेळी ते बोलत होते. शिवनेरी स्मारक समिती व शिवसेना यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

या वेळी खासदार अनिल देसाई, शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार शरद सोनवणे, नगराध्यक्ष श्‍याम पांडे, शिवनेरी स्मारक समितीचे अध्यक्ष हेमंत मावळे, कार्याध्यक्ष मधुकर काजळे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. 

आदित्य ठाकरे यांनी शिवजन्मस्थळास भेट दिली, त्या ठिकाणी शिवजन्माचा पाळणा गाण्यात आला. त्यानंतर भगवा ध्वज फडकविण्यात आला. शिवकुंज येथील राजमाता जिजाऊ व बालशिवबा यांच्या पुतळ्यास ठाकरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सभा झाली. 

ठाकरे म्हणाले, ‘‘शिवरायांचा भगवा झेंडा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्लीपर्यंत पोचविला. शिवसेना हा इतर पक्षांप्रमाणे दिल्लीसमोर झुकणारा नसून दिल्लीला झुकविणारा पक्ष आहे. छत्रपती शिवरायांनी दिलेले बळ घेऊन जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न आहे. देशात अविचारी लोक एकत्र येण्यापेक्षा समविचारी लोक एकत्र येणे गरजेचे आहे; म्हणूनच या निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती झाली आहे.’’  

शिवजयंतीनिमित्त सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेच्या वतीने दीपोत्सव व गडप्रदक्षिणेचे आयोजन करण्यात आले होते. आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी भजने सादर केली. सकाळी श्रमिक गोजमगुंडे यांच्या हस्ते शिवाई देवीस अभिषेक करण्यात आला. शिवाई देवी मंदिर ते शिवजन्मस्थळापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. शिवजन्मस्थळावर पाळणा गाऊन जन्मसोहळा साजरा करण्यात आला. या वेळी समितीच्या वतीने देण्यात येणारा राजमाता जिजाऊ पुरस्कार डॉ. मोहिनी विठ्ठल पाबळे यांना प्रदान करण्यात आला आहे, असे समितीचे कार्याध्यक्ष मधुकर काजळे यांनी सांगितले. श्री क्षेत्र ओझर ते किल्ले शिवनेरी अशी शिवयात्राही काढण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com